Saturday, July 21, 2012

कारल्याच्या कुरकुरीत काचर्‍या

लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
कारली २
कांदे २
मिरच्या ६
तीळ २ चमचे
कोथिंबीर
लसूण १० पाकळ्या
तेल २ चमचे
मोहरी १/२ चमचा
हिंग २ चिमुट
हळद पाव चमचा
मीठ चवीप्रमाणे
साखर आवडत असल्यास १ चमचा
क्रमवार पाककृती:
कारल्याचे उभे चार भाग करून पांतळ पांतळ चिरून घ्यावी. त्याला थोडे मीठ लावून त्यावर पाण्याचा हबका मारून बाजूला ठेवावी.
कांदे चार भाग करून पांतळ पांतळ चिरून घ्यावेत.
लसूण उभा पांतळ पांतळ चिरून घ्यावा.
मिरच्या उभ्या पांतळ पांतळ चिरून घ्याव्यात. ( या कृतीला कृपया "पांतळ पांतळ कारली " म्हणू नये या चिरण्यावर या भाजीचा कुरकुरीतपणा अवलंबून असतो, त्यामुळे तेव्हढे कष्ट हवेतच. )
आता कारली स्वच्छ धुवून घ्यावीत. घट्ट पिळून घ्यावीत. ( हे घट्ट पिळणे महत्वाचे. मेथीही अशी घट्ट पिळून केली की वेगळी चव येते. तज्ज्ञांनी यामागचे शास्त्रीय कारण सांगावे )
पॅनमध्ये तेल तापत ठेवावे. मोहरी टाकावी. ती तडतडली की लसूण टाकावा. तो लालसर झाला की मिरच्या टाकाव्यात. हिंग, हळद टाकावी. तीळ टाकावेत.लगेच कारली टाकावी.
कारली थोडी परतली की कांदा टाकावा. चवीपुरते मीठ टाकून मंद गॅसवर परतत ठेवावे. (झाकण ठेऊ नये - भाजीला पाणी सुटेल. )
किमान २० - ३० मिनिटे तरी मंद आचे वरती ही कारली मधून मधून परतत ठेवावी.
खुरकुरीत होत आली की आवडत असल्यास साखर घालावी. ( कांदा भरपूर असल्याने त्याची गोडी बहुदा पुरेशी होते. परंतु ज्यांना आवडत असेल त्यांनी साखर घालावी. )साखर घातल्यावर, ती विरघळली की लगेच गॅस बंद करावा, नाही तर भाजीला काळसर रंग येतो.
तयार आहेत कारल्याच्या कुरकुरीत काचर्‍या. ही  भाजी गार झाली कि गारच खावी, तरच  कुरकुरीत लागते.

वाढणी/प्रमाण:
खाल, त्या प्रमाणे :)
अधिक टिपा:
ही भाजी आंबटवरण भाताबरोबर फार फर्मास लागते.
कोरडी असल्याने २-३ दिवसही टिकते. त्यामुळे प्रवासात नक्की करते मी.
माहितीचा स्रोत:
पारंपारिक, काही माझे प्रयोग.

No comments:

Post a Comment