Wednesday, June 23, 2021

झटपट अंडा बिर्याणी

 साहित्य:

तांदुळ शक्यतो बासमती १ वाटी

अंडी २

बटाटे २

कांदे २

टॉमेटो १

आलंलसूणपेस्ट १ चमचा

तिखट १ चमचा

हळद अर्धा चमचा

गरम मसाला पूड १ चमचा

४मिरे, दालचिनीचे २ तुकडे, तमालपत्र १

४ काजू, ४ बेदाणे

पुदिना, कोथिंबीर एक मुठ

दही २ चमचे

पाव कप दूध

तेल

तूप १ चमचा

मीठ


कृती 

कुकरमधे पाणी घालून गॅसवर ठेवा

तांदुळ धुवून घ्या

कुकरच्या मोठ्या भांड्यात तांदुळ दोन वाट्या पाणी, एक चमचा तुप, अर्धा चमचा गरम मसाला आणि तांदळापुरतं मीठ घाला

दुसऱ्या भांड्यात अंडी आणि बटाटे ठेवा

दोन्ही भांडी कुकरमधे ठेवून कुकर बंद करून २ शिट्या करून ५ मिनिटं बारीक गॅसवर ठेवा। अन नंतर बंद करा

कुकर होई पर्यंत मोठ्या पॅनमधे तेल जरा जास्ती घ्या। दिड कांदा उभा चिरून तो तेलात परता। लाल होई पर्यंत परतायचा। दुसरीकडे उरलेला अर्धा कांदा बारीक चिरा। टॉमेटो बारीक चिरा।  काजु उभ्यात २-२ तुकडे करा। बेदाणेही उभ्यात दोन भाग करा।

एव्हाना कुकर झाला असेल गॅस बंद करा

कांदा लाल होईस्तोवर परता

गॅस बंद करून आता कांदा निथळून बाहेर काढा। तेल तसेच राहू देत

कुकर गार झाला असेल तर अंडी बटाटे काढून गार पाण्यात घाला

भाताचे भांडे काढून भात काट्याने मोकळा करा

अंडी बटाटे सोलून काट्याने जरा टोचे मारा

कांदा परतलेल्या  पॅन खालचा गॅस चालू करा। अंडी बटाटे त्यात टाका। वरून थोडे थोडे मीठ हळद तिखट टाका आणि पटपट परतून घ्या अन बाहेर काढा।

आता बारीक चिरलेला कांदा त्याच तेलात परता।  आलं लसूण पेस्ट परता। काजू, बेदाणे, मिरे, दालचिनी, तमालपत्र घाला। आता टॉमेटो टाकून परता मग गॅस बारीक करून झाकण ठेवा।

अंडी अन बटाटे अर्धे कापा।

झाकण काढून टॉमेटो शिजे पर्यंत परता। आता गॅस बंद करून मीठ हळद तिखट गरम मसाला घाला जरा परता। आता दही जरा घोटून यात घाला थोडे परता।  दिड वाट्या पाणी यात घाला। गॅस सुरु करा, बारीकच ठेवा।  कापलेले बटाटे अन अंडी नीट रचा। आता यावर निम्मी कोथिंबीर पुदिना टाका।वरून लाल परतलेला कांदा घाला। आता भात पसरा वरून उरलेली कोथिंबीर पुदिना टाका। सगळे हाताने जरा खाली दाबून बसवा।

ज्या भांड्यात परतलेली अंडी बटाटे काढून ठेवले  त्यात पावकप दुध टाका। छान निपटून घ्या। दुधाचा रंग छान केशरी होईल। हे दुध भातावर गोलाकार टाका।

आता झाकण ठेऊन मंद गॅसवर किमान १५ मिनिटं राहु देत। नंतर गॅस बंद करा।

५ मिनिटांनी वाढून घ्या, झटपट अंडा बिर्याणी!