Saturday, October 29, 2022

सीकेपी पद्धतीचे कोंबडीवडे पीठ

 

साहित्य( कंसात प्रमाण)

तांदुळ (6), उडिद डाळ(2), धणे(1), चणा डाळ(0.5), जिरे(0.25), मिरे(0.10)

तांदूळ धुवून सुकवून घेणे.

नंतर सगळं सुटं सुटं मंद गॅसवर गुलाबी भाजून घेणे.

आणि मग दळणे.

मटण, चिकन, मसूर आमटी वगैरे सोबत खायचे असतील तर,  मीठ, हळद, पाणी घालून थालिपीठा इतकं घट्ट भिजवून झाकून ठेवणे. दहा मिनिटांनी पाण्याचा हात लावून पुरीसारखे थापून तळणे. टम्म फुगतात.


नुसते खायचे असतील तर जास्तीचे तिखट, कोथिंबीर घालायचे. अन थापताना मेदुवड्या सारखे मधे भोक पाडून मग तळायचे. हेही रिंगसारखे फुगतात.

Thursday, October 27, 2022

रसलिंबू - लिंबाचे तिखट गोड लोणचे

 साहित्य 

लिंबू सहा

एक वाटी साखर

मीठ चमचाभर

तिखट 3 चमचे

हळद अर्धा चमचा

तेल 3 चमचे

हिंग


कृती

लिंबं स्वच्छ धुवून 10 मिनिटं पाण्यात ठेवावीत. मग पाच लिंबं प्रत्येकी 8 भागात चिरून, बिया सगळ्या नीट काढून टाकाव्यात. एका लिंबाचा रस काढून वेगळा ठेवावा.

आता लिंबाचे तुकडे ग्राईंडरमधे घालून बारीक वाटावे. सालीसकट.

मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात हिंग टाकावा. हिंग फसफसला की त्यावर लिंबाचे वाटण टाकावे. हळद, तिखट, मीठ, साखर सगळे घालून मोठ्या गॅसवर परतत रहावे. साखर विरघळून थोडी आटत आली की लिंबाचा रस घालून हलवून मंद गॅसवर शिजू द्यावे. लक्ष ठेवून मधून मधून परतत रहावे. मिश्रणाचा रंग जरा डार्क होऊ लागला की गॅस बंद करावा पण अधून मधून हलवावे.

पूर्ण गार झाले की बरणीत भरावे. साधारण एका दिवसातच लोणचे मुरु लागले, लगेच वापरायला हरकत नाही. 4-5 दिवसात सालीचा कडवटपणा पूर्ण जातो. या प्रमाणात साधारण दोन वाट्या रसलिंबू होते.