Thursday, July 7, 2022

सीकेपी आंबटवरणं


तूरडाळ1 वाटी मूगडाळ 1 मुठ. धुवून, पाणी घालून, हळद, हिंग आणि थेंबभर तेल टाकून कुकरमधे छान शिजवून घ्यायची. मग ती रवीने मोडून पाणी टाकून जरा सैल करायची. हे सगळ्यांना सेम.


1. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, ती तडतडली की मेथ्या हिंग कढिपत्ता. त्यावर बारीक चिरलेला कांदा. तो ट्रान्सपरन्ट झाला की त्यावर शिजवलेली डाळ टाकायची. वर तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, गुळ,  कोथिंबीर टाकून पाच मिनिटं उकळवाचं.


2. पातेल्यात डाळ उकळवत ठेवायची त्यात तिखट, चिंचेचा कोळ, कोथिंबीर टाकायची. दुसरीकडे कढल्यात तेल. त्यात मोहरी अन ठेचलेला लसूण टाकायचा. मोहरी तडतडली की हिंग टाकून लगेच फोडणी उकळत्या आंबटवरणात टाकायची. वरून झाकण ठेवायचं. पाच मिनिटं तशीच उकळवायचे. 


3. पातेल्यात डाळ उकळवत ठेवायची. त्यात आमसुलं, कोथिंबीर टाकायची. दुसरीकडे तेलात मोहरी, बडिशेप चिमुटभर, लसूण ते तडतडलं की हिरवी मिरची, कढिपत्ता अन सगळं लगेच आंबटवरणात. झाकण. पाच मि उकळवणे.


4. तेलात मोहरी, हिंग, कढिपत्ता.  त्यावर बारीक चिरलेला कांदा परतणे. वर बारीक चिरलेला टॉमेटो परतणे. तेल सुटू लागलं की त्यावर डाळ, तिखट, मीठ. ओलं खोबरं, लसूण बारीक वाटून ते आंबटवरणात घालणे.  वरून कोथिंबीर

5. डाळ शिजवतानाच त्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो आणि हिरवी मिरची टाकायची.

सगळं,घोटून पाणी घालून उकळवत ठेवायचं. कढल्यात तेल, त्यात मोहरी, मेथ्या, हिंग, कढिपत्ता याची फोडणी करून ती आंबटवरणावर. झाकण. पाच मि उकळणे.


तळटिप- सीकेपी तिखटामधे धणे, बडिशेप इनबिल्ट असते. जर सेम स्वाद हवा असेल तर याच्या पावडरी चिमुटभर टाकत चला.