Showing posts with label भात. Show all posts
Showing posts with label भात. Show all posts

Friday, December 23, 2022

सोजी

 साहित्य

तांदुळ एक वाटी

बटाटा मध्यम एक सालं काढून मध्यम (साधारण 2इंचाचे)  तुकडे

कांदा मध्यम एक, बटाट्या सारखेच तुकडे

शेंगदाणे मूठभर

लवंग ४-५, दालचिनी एक तुकडा

हिंग, तिखट, हळद, मीठ चवी प्रमाणे

तेल 2 चमचे,  आवडत असेल तर तूप वापरलं तरी चालेल.

पाणी तीन वाट्या आधण, लागले तर अजून अर्धा वाटी.


कृती

तांदूळ धुवून निथळवत ठेवावेत. बटाट्याचे तुकडे धुवून निथळवत ठेवावेत.

पसरट, जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कुकरमधे तेल/ तुप टाकावे. त्यात हिंग टाकून लगेच लवंगा, दालचिनी टाकून कांदा टाकावा. जरा परतून त्यावर बटाटे, दाणे टाकावे. आता हळद, तिखट टाकून परतावे. आता तांदूळ टाकावेत तेही परतावेत. मग आधणाचं पाणी टाकून मीठ टाकावे. सगळे खळखळ उकळले की गॅस बारीक करून झाकण लावून खिचडी मऊ शिजू द्यावी. कुकर असेल तर तीन शिट्या करून दोन मिनिटं बारीक गॅस वर ठेवावा. ही खिचडी मऊसर असते.

तयार खिचडी वर तूप, सोबत पापड. आवडत असेल तर ताकाला वरून तूप जिऱ्याची फोडणी देऊन चमचाभर साखर, मीठ, कोथिंबीर घालून तेही सोबत द्यावे. 

Friday, August 16, 2019

वालाची खिचडी



साहित्य:

भिजवून मोड आलेले सोललेले वाल एक वाटी

तांदुळ एक वाटी

ओलं खोबरं पाव वाटी

लसूण 7-8 पाकळ्या

हिरवी मिरची एक

कांदे दोन

हिंग, हळद, तिखट, मीठ

कोथिंबीर, लिंबु/दही
कृती

कांदे बारीक चिरून घ्यावे.

निम्मा कांदा, खोबरं, लसूण, मिरची सगळं बारीक वाटावं थोडं पाणी घालून.

पातेल्यात 3-4 चमचे तेल घालून ते चांगलं गरम झालं की गॅस बारीक करून त्यात हिंग, हळद घालून वर वाल परतावेत दोन मिनिटं, मग त्यावर कांदा घालून तोही परतावा दोन मिनिटं. आता धुतलेले तांदूळ परतावेत दोन मिनिटं. मग वाटण घालून दोन मिनिटं परतावं.

आता आधणाचं पाणी घाला. तिखट, मीठ घाला. गॅस मोठा करून छान उकळू द्या. पाणी थोडं आळलं की कोथिंबीर टाकून गॅस बारीक करून झाकण ठेऊन खिचडी शिजू द्या. साधारण 7-8 मिनिटं.


वाढताना सोबत ओलंखोबरं, कोथिंबीर, लिंबू वाढा. पोह्याचा पापड सोबत असेल तर लिंबा एेवजी दही  :)

Thursday, August 9, 2018

व्हेज मटण बिर्याणी


साहित्य :

दोन वाट्या भाजणी, तीन वाट्या दिल्ली राईस, तमालपत्र 2-3, मसाला वेलची एक, साधी वेलची3-4, मिरे 8-10, काजु 10-12( पाकळ्या सुट्या करून घ्या), उभे चिरलेले मोठे4-5 कांदे, पुदिना किमान चार मुठी, दही 3 मोठे चमचे, हळद, तिखट एक चमचा, कांदालसूण मसाला एक चमचा, मीठ, तेल तळणासाठी, साजुक तूप 6 चमचे, एक टॉमेटो , कप भर दूध, 8-10 केशराच्या काड्या, 2 बटाटे

कृती:

दिल्ली राईस तांदूळ  भिजवून निथळत ठेवा.
कांदे उभे चिरून रुमालावर पसरून ठेवा
पुदिना धुवून बारीक चिरून ठेवा
भाजणीमधे तिखट, मीठ, हळद, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून दोन चमचे दही घालून थोडे पाणी घालून भज्यासाठी लागते तसे पीठ भिजवून घ्या.
आता तेलामधे या पिठाची मध्यम आकाराची भजी तळून घ्या. ती बाजूला ठेवा.¹
आता त्याच कांदा तेलात तळायला घ्या
दुसरीकडे पसरट भांड्यात, 3 चमचे साजुक तुपात तमालपत्र, मिरे, मसाला वेलची, साधी वेलची, काजू परतून घ्या
त्यावर निथळत ठेवलेले तांदूळ परता. एक चमचा दही, आधण आणि मीठ टाकून भात मोकळा शिजवून घ्या²
शिजलेला भात परातीत निवत ठेवा. याच वेळेस तमालपत्र, मिरे , मसाला वेलची, साधी वेलची वाटलं तर काढून टाका.
सगळा कांदा तळून झाला की त्यावर कांद्यावर एक चमचा तिखट, एक चमचा कांदालसूण मसाला घालून मिक्स करून घ्या.³
टॉमेटो दोन भाग करून उभे चिरुन घ्या⁴
दोन बटाटे सालं काढून त्याच्या पांतळसर गोल चकत्या कापून त्यालाा थोडं मीठ लावून ठेवा.

थर लावणे :

परसट जाड बुडाच्या पातेल्यात दोन चमचे तूप टाकून त्यावर  बटाट्याच्या काचऱ्या पसरा. त्यावर 1/3 भात घालून तो पसरून घ्या. त्यावर 1/3 कांदा घाला. भज्यांपैकी 1/2 भजी पसरा. चिरलेला सगळा टॉमेटो पसरा. 1/2 पुदिना पसरा.
आता दुसरा थर. पुन्हा 1/3 भात, 1/3 कांदा, 1/2 भजी, 1/2 पुदिना, तळलेले 1/2 काजु
आता तिसरा थर. उरलेला 1/3 कांदा, उरलेला 1/3 भात, उरलेले 1/3 काजु.
आता अर्धाकप दूधात केशर टाका. हे दूध बिर्याणीवरती पसरा
बिर्याणीवरती घट्ट झाकण लावा.
खाली जाड तवा ठेऊन बारीक आचेवर किमान अर्धा तास ठेवा. नंतर गॅस बंद करून 15 मिनिटांनी बिर्याणी ताटात वाढून घ्या
6-8 जणांसाठी भरपूर होईल

Saturday, September 2, 2017

नारळीभात

साहित्य:

एक पूर्ण खोवलेला नारळ

दोन वाट्या तांदूळ, शक्यतो बासमती तुकडा किंवा सुरती कोलम

किसलेला गूळ दोन वाट्या ( फार गोड हवा असेल तर प्रमाण वाढवा)

लवंगा 2-4

जायफळ किसून अर्धा चमचा

सात आठ भिजवून सोलून तुकडे केलेले बदाम

कृती:

तांदुळ धुवून निथळत ठेवायचे.

नारळ खवणून मिक्सरमधून एक वाटी पाणी घालून वाटून घ्यायचा. मग त्यातलं दूध पिळून काढायचं. हे जाड दूध. मग पुन्हा चोथ्यात एक वाटी पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं. मग पिळून दुध काढायचं अन चोथा बाजुला ठेवायचा. हा चोथा भातासाठी वापरणार नाही आहोत. त्याचा उपयोग शेवटी सांगते. तर हे दुसरं दूध पांतळ दूध. दोन्ही दुधं स्वतंत्र ठेवा.

आता तुपावर दोन लवंगा टाकायच्या. गॅस बारीक ठेवा. त्यात बदामाचे काप घाला. बदामाचा खमंग वास आला की त्यात तांदूळ टाकायचे. छान लालसर परतून घ्यायचे. मंदाग्निवर.

आता त्यात नारळाचे पांतळ दूध टाकायचे. आणि गॅस मोठा करून छान रटरटू द्यायचं. आता गॅस बारीक करून जाड दूध टाकायचं अन झाकण ठेऊन भात बोटमोड्या शिजवून घ्यायचा.

भात पूर्ण शिजला की,भांड्या खाली तवा ठेवा. तांदळाच्या समप्रमाणात किसलेला गूळ टाकायचा, जायफळ किसून घालायचं. आणि उलथण्याच्या उलट्या बाजुने हलवायचा, नाजूकपणे. जसजसा गूळ वितळत जाईल तसतसे हे हलवणं सोपं जाईल. गूळ सगळीकडे मिसळला की पुन्हा झाकण घालून एक वाफ येऊ देत.

तयार आहे नारळी भात. यात नारळाचा चोथा नसल्याने हा भात अतिशय सुरमट होतो. दुसऱ्या दिवशी हा नारळीभात अफलातून लागतो :)