Saturday, July 21, 2012

गवार ढोकळी

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
गवारीच्या कोवळ्या शेंगा ( गावरान गवार नको ) - १०० ग्रॅम
गव्हाचे पीठ - १ वाटी
हरभराडाळीचे पीठ - २ चमचे
हळद - आर्धा चमचा
तिखट १ चमचा ( हवे असल्यास वाढवले तरी चालेल )
गूळ - एक मोठा खडा
मीठ चवीनुसाए
ओवा - १ चमचा
तेल - ४ चमचे
पाणी
क्रमवार पाककृती:
गवारीच्या शेंगाची देठं आणि टोकं काढून टाका. शेंगा लहान असतील तर मोडू नका. मोठ्या असतील तर त्यांचे तोडून दोन भाग करा. आता एक लिटर पाण्यात गवार घालून गॅसवर शिजत ठेवा. उकळी आल्यावर गॅस बारीक करून झाकण ठेऊन शिजू द्या.
कणीक, बेसन एकत्र करा. त्यात पाव चमचा हळद, आर्धा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, थोडे तेल टाकून पाणी घालून चपात्यांसाठी भिजवतो तशी कणीक भिजवून घ्या.
गवार शिजत आली का ते पहा. शिजायला लागली की तिचा रंगही बगलतो अन ती सॉफ्ट दिसायला लागते. गवार शिजत आली की त्यात पाव चमचा हळद, आर्धा चमचा तिखट, गुळाचा मोठा खडा अन चवीपुरते मीठ घालून उकळू द्या. पाणी कमी झाले असल्यास त्यात २-३ भांडी पाणी घालावे.
आता कणकेचे गोळे पांतळ लाटा- फुलक्यासारखे पांतळ लाटावेत.
त्याचे शंकरपाळ्यासारखे काप करून गवारीसह उकळणार्‍या पाण्यात हे काप सोडा.
आता गॅस बारीक करून सगळे एकदा नीट ढवळून झाकण घालून ५ - ७ मिनीटं शिजू द्यात.
छोट्या कढईत ४ चमचे तेल घेऊन त्यात फक्त ओवा टाका. चांगला तडतडला की याची फोडणी गवार ढोकळी वर ओता. ( हे सांभाळून करावे, हातावर फोडणी उडण्याची भीती असते.) पुन्हा झाकण ठेऊन ५ मिनिटं वाफ येउ द्या. मग गॅस बंद करा. पाच मिनिटांनी झाकण काढून गरम गरम गवार ढोकळी शेंगदाणा तेल ( कच्चेच ) टाकून खावी .
वाढणी/प्रमाण:
दोघांना भरपूर होते. इतर काहीही लागत नाही.
अधिक टिपा:
फोडणी देताना भांड्यावरचे झाकण कमीत कमी बाजूला करावे, म्हणजे सगळा वास आतल्या आत जिरतो.
ही सकाळी किंवा रात्रीही, संपूर्ण जेवण म्हणून पुरते.
गूळ मात्र व्यवस्थित असावा लागतो.

gavar dhokali.jpg

No comments:

Post a Comment