Saturday, August 4, 2012

फुलके

लागणारे जिन्नस :

कणीक २ वाट्या
मीठ चवी पुरते
तेल २ चमचे
पाणी लागेल तेव्हढे

कृती :

कणीक, मीठ आणि १ चमचा तेल नीट एकत्र करावे. हळूहळू पाणी टाकून सैलसर भिजवावे. शेवटी १ चमचा तेल टाकून छान मळून घ्यावे. घट्ट झाकण लावून ५-१० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर पीठाचा हात लावून पुन्हा थोडे मळून घ्यावे.

आता बारीक गॅसवर तवा तापत ठेवावा. त्याला एक बोट तेल लावा, फडक्याने तवा नीट पूसून घ्या. यामुळे संपूर्ण तव्यावर तेलाचा एक पुसटसा थर होईल.

कणकेचा मुठीत मावेल इतका गोळा घेऊन हलक्या हाताने लागेल तेव्हढे पीठ लावून फुलका गोल लाटून घ्यावा. उलट पुलट करू नये. एकच बाजू वर घेऊन लाटावे.

आता तव्यावर थोडे पीठ भुरभुरवा. त्यावर फुलका लाटलेली वरची बाजू खाली जाईल अशी टाका. फुलका तव्यावर चिकटत नाहीये ना हे हलवून पहा. चिकटला असेल तर हलक्या हाताने सोडवून घ्या, उलटा करू नका. गॅस बारीकच ठेवा.

दुसरा कणकेचा गोळा घेऊन पीठात बुडवून लाटण्यासाठी तयार करा. आता तव्यावरचा फुलका उलटवा.
तुमचा लाटण्याचा स्पीड कमी असेल तर गॅस बारीकच ठेवा. आता पुढचा फुलका लाटा.

तो लाटून तयार झाला की गॅस मोठा करा. हळूच फुलका खालून लाल झालाय का ते पहा. फुलका हळूच उलटा करून, तवा गॅसवरून बाजूला घेऊन फुलका हळूच गॅसवर सोडा.
ही प्रोसेस जितकी हळूवार कराल तेव्हढी फुलका टम्म फुगण्याची शक्यता वाढेल :)

फुलका पूर्ण फुगला की गॅस बारीक करा, फुगलेला फुलका काढून खाली घ्या.

तयार आहे वरून शुभ्र पांढरा, खालून खरपूस, पूर्ण फुगलेला अन लुसलुशीत गरमा गरम फुलका.

कणिक सैलसर भिजणे, काही वेळ झाकून ठेवणे, लाटताना उलट्-पुलट न करणे, तव्याला फुलका न चिकटणे, गॅस कमी-जास्त करण्यातले कौशल्य, फुलका गॅसवर हळूवार टाकणे या सर्व पायर्‍या तुम्ही किती कौशल्याने करता यावर फुलका "जमणे" ठरते :)

व्हिडिओ :
 

No comments:

Post a Comment