Saturday, November 2, 2024

सोडे घालून पोहे

 


खरं तर फार काही वेगळं नाही. तरी तपशीलवार-

(चार जणासाठीचा अंदाज)
आधी मूठभर सोडे गरम पाण्यात भिजत ठेवायचे
मग परहेड एक मूठ पोहे भिजवून ठेवायचे.
दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे.
4-6 मिरच्या उभ्याच चिरायच्या. लिंबू कापून बिया काढायच्या.
आता सोडे मऊ झाले असतील तर ते कात्री/ सुरीने कापून घेणे.(2-3 तुकडे एकाचे)

अंमळ जास्त तेल घेऊन नेहमीची मोहरी, हिंग फोडणी करून मिरच्या, कांदा घालावा. हळद टाकावी. कांदा जरा परतला की सोडे घालावेत. जरा परतून गॅस बारीक करून झाकण ठेवावं 3-4 मि.
मग परतवून पोहे, कोथिंबीर, मीठ (साखर चिमुटभरही घालायची नाही) टाकून परतवावं. पुन्हा झाकण ठेवून दणदणीत वाफ काढावी. गॅस बंद करावा.
3-4 मि नी झाकण काढून एकदा सगळं हलवावं. वरून लिंबू, अजून जरा कोथिंबीर घालून सर्व्ह करावेत.

Friday, October 11, 2024

ज्वारीची धिरडी कम आंबोळी

साहित्य:

एक वाटी ज्वारी पीठ

अर्धी वाटी रवा

अर्धीवाटी दही

डाळं/ दाणे मूठभर

मिरच्या चवीनुरुप

कोथिंबीर असेल तर

मीठ

गाजर, कोबी, सि मी हवं ते बारीक किसून/ चिरून


कृती:

भाज्या सोडून सगळं + एक वाटी पाणी

घालून मिक्सीत फिरवून घ्यायचं. साधारण इडलीपीठा सारखी कनिसिस्टन्सी हवी. तासभर झाकून ठेवायचं. नंतर भाज्या मिक्स करून मध्यम आचेवर आंबोळी काढायची. झाकण ठेवून. 

तूप/ लोण्यासोबत खायला घ्यातत

आयत्या वेळी करायचं तर इनो टाकू शकाल अर्धा चमचा.



Saturday, July 27, 2024

अळणी चिकन

चिकनला दही, हळद, मीठ, लसूण वाटून लावून ठेवा.

ओलं खोबरं, लसूण, मिरे (तिखटपणा फक्त याचाच असणार तर तुमच्या चवीनुरुप), 5-6 काजू हे बारीक वाटून घेणे.

तेलात 2 तमालपत्र तोडून टाका, 4 लवंगा टाका  आता त्यात कांदा बारीक चिरून  परत. त्यात चिकन परत. गरम पाणी घालून चिकन छान शिजू देत.

मग वाटण घालून एक उकळी काढून झाकून पाच मिनिटं शिजू दे. मग हवं तितकं घट्ट, जाड ठेव. वरून कोथिंबीर.


यात टॉमेटो, तिखट काहीही लाल घालायचं नाही. पिवळसर सोनेरी रंग येतो. चिकनची चव मस्त उतरते.

अगदी आवडत असेल तर वाढताना क्रिम.

Saturday, August 26, 2023

कोळंबीची खिचडी


साहित्य

पाव किलो कोळंबी

लसूण 7-8 पाकळ्या

मिरची एक

एक कांदा

ओलं खोबरं नारळाची अर्धी वाटी

हळद, तिखट, मीठ

तांदुळ दोन वाट्या

कोथिंबीर


कृती

तांदुळ धुवून निथळत ठेवावेत.

कोळंबी निवडून पोटातला काळा धागा काढून स्वच्छ धुवावी. निथळून त्यावर हळद तिखट मीठ टाकून नीट मिक्स करावी.

ओलं खोबरं, लसूण, मिरची बारीक वाटून घ्यावी.

कांदा बारीक चिरून घ्यावा

एकीकडे आधणाचं पाणी बारिक गॅसवर ठेवावं. दुसरीकडे जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकून त्यात कांदा टाकून गुलाबीसर परतावा. मग त्यात कोळंबी टाकून ती ही परतावी. आता तांदूळ टाकावेत तेही परतावेत. त्यावर वाटणं टाकून आधणाचं पाणी टाकावं, मीठ टाकावं. आणि छान उकळी आली की गॅस बारीक करून झाकण घालून खिचडी शिजू द्यावी. वाढताना वरून ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू. सोबत पोह्याचा पापड तळुन वा साधा.

Friday, December 23, 2022

सोजी

 साहित्य

तांदुळ एक वाटी

बटाटा मध्यम एक सालं काढून मध्यम (साधारण 2इंचाचे)  तुकडे

कांदा मध्यम एक, बटाट्या सारखेच तुकडे

शेंगदाणे मूठभर

लवंग ४-५, दालचिनी एक तुकडा

हिंग, तिखट, हळद, मीठ चवी प्रमाणे

तेल 2 चमचे,  आवडत असेल तर तूप वापरलं तरी चालेल.

पाणी तीन वाट्या आधण, लागले तर अजून अर्धा वाटी.


कृती

तांदूळ धुवून निथळवत ठेवावेत. बटाट्याचे तुकडे धुवून निथळवत ठेवावेत.

पसरट, जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कुकरमधे तेल/ तुप टाकावे. त्यात हिंग टाकून लगेच लवंगा, दालचिनी टाकून कांदा टाकावा. जरा परतून त्यावर बटाटे, दाणे टाकावे. आता हळद, तिखट टाकून परतावे. आता तांदूळ टाकावेत तेही परतावेत. मग आधणाचं पाणी टाकून मीठ टाकावे. सगळे खळखळ उकळले की गॅस बारीक करून झाकण लावून खिचडी मऊ शिजू द्यावी. कुकर असेल तर तीन शिट्या करून दोन मिनिटं बारीक गॅस वर ठेवावा. ही खिचडी मऊसर असते.

तयार खिचडी वर तूप, सोबत पापड. आवडत असेल तर ताकाला वरून तूप जिऱ्याची फोडणी देऊन चमचाभर साखर, मीठ, कोथिंबीर घालून तेही सोबत द्यावे. 

Saturday, October 29, 2022

सीकेपी पद्धतीचे कोंबडीवडे पीठ

 

साहित्य( कंसात प्रमाण)

तांदुळ (6), उडिद डाळ(2), धणे(1), चणा डाळ(0.5), जिरे(0.25), मिरे(0.10)

तांदूळ धुवून सुकवून घेणे.

नंतर सगळं सुटं सुटं मंद गॅसवर गुलाबी भाजून घेणे.

आणि मग दळणे.

मटण, चिकन, मसूर आमटी वगैरे सोबत खायचे असतील तर,  मीठ, हळद, पाणी घालून थालिपीठा इतकं घट्ट भिजवून झाकून ठेवणे. दहा मिनिटांनी पाण्याचा हात लावून पुरीसारखे थापून तळणे. टम्म फुगतात.


नुसते खायचे असतील तर जास्तीचे तिखट, कोथिंबीर घालायचे. अन थापताना मेदुवड्या सारखे मधे भोक पाडून मग तळायचे. हेही रिंगसारखे फुगतात.

Thursday, October 27, 2022

रसलिंबू - लिंबाचे तिखट गोड लोणचे

 साहित्य 

लिंबू सहा

एक वाटी साखर

मीठ चमचाभर

तिखट 3 चमचे

हळद अर्धा चमचा

तेल 3 चमचे

हिंग


कृती

लिंबं स्वच्छ धुवून 10 मिनिटं पाण्यात ठेवावीत. मग पाच लिंबं प्रत्येकी 8 भागात चिरून, बिया सगळ्या नीट काढून टाकाव्यात. एका लिंबाचा रस काढून वेगळा ठेवावा.

आता लिंबाचे तुकडे ग्राईंडरमधे घालून बारीक वाटावे. सालीसकट.

मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात हिंग टाकावा. हिंग फसफसला की त्यावर लिंबाचे वाटण टाकावे. हळद, तिखट, मीठ, साखर सगळे घालून मोठ्या गॅसवर परतत रहावे. साखर विरघळून थोडी आटत आली की लिंबाचा रस घालून हलवून मंद गॅसवर शिजू द्यावे. लक्ष ठेवून मधून मधून परतत रहावे. मिश्रणाचा रंग जरा डार्क होऊ लागला की गॅस बंद करावा पण अधून मधून हलवावे.

पूर्ण गार झाले की बरणीत भरावे. साधारण एका दिवसातच लोणचे मुरु लागले, लगेच वापरायला हरकत नाही. 4-5 दिवसात सालीचा कडवटपणा पूर्ण जातो. या प्रमाणात साधारण दोन वाट्या रसलिंबू होते.