Monday, August 8, 2016

सोपे बेसिक चिकन (विद्यार्थ्यांसाठी)

 साहित्य :
चिकन 500 ग्रॅम
दही 3 चमचे
लसूण 10 पाकळ्या
आलं एक इंच
तिखट 1¹/² चमचे,
हळद ¹/² चमचा
मीठ 1चमचा
मसाला 1¹/² चमचा ( बडिशेप, धणे, लवंग, मिरे, दालचिनी यांची पूड)
तेल 3-4 चमचे
कांदे मोठे दोन
टॉमेटो 2

कृती:

1. चिकन स्वच्छ धुवून, निथळून त्याला दही, हळद, तिखट, मीठ लावून घेणे.

2. लसूण, आलं, चॉप करून, त्यात मसाला एकत्र करून तो लावून घेणे.

3. कांदा, टॉमेटो चॉप करणे.

4. पॅन मधे तेल तापवून त्यात कांदा लाल होई पर्यंत परतणे.

5. टॉमेटो परतणे,  मग दोन मिनिटं झाकण ठेवणे.

6. नंतर पुन्हा तेल सुटे पर्यंत परतणे.

7. आता चिकन टाकून परतणे. तेल सुटेपर्यंत परतणे. हवे तेव्हा गॅस लहान, मोठा करणे.

8. आता दिड कप पाणी, लागले तर अजून टाकून, छान उकळी आणणे.

9. खळखल उकळले की गॅस बारीक करून झाकण ठेऊन शिजवणे.

10. दर पाच मिनिटांनी हलवणे. हवे तर पाणी अजून अर्धाकप घालणे.

11. साधारण 20 मिनिटांनी चिकन शिजेल.

12. शेवटी चव चाखून बघणे. तिखट मीठ अॅडजेस्ट करणे.


फोटो:
ह्या  कृतीने माझ्या लेकाने केलेल्या चिकनचा फोटो



Thursday, June 2, 2016

चिकन बिर्याणी


साहित्य :
एक किलो चिकन, तीन वाट्या दिल्ली राईस, तमालपत्र 2-3, मसाला वेलची एक, साधी वेलची3-4, मिरे 8-10, काजु 10-12( पाकळ्या सुट्या करून घ्या), उभे चिरलेले मोठे4-5 कांदे, पुदिना किमान चार मुठी, दही 3 मोठे चमचे, आलं लसूण पेस्ट 3 चमचे, हळद, तिखट, मीठ, तंदुर मसाला दिड चमचा, तेल तळणासाठी, साजुक तूप 4 चमचे, एक टॉमेटो बारीक चिरून, कप भर दूध, 8-10 केशराच्या काड्या
कृती: 

दिल्ली राईस तांदूळ  भिजवून निथळत ठेवा. (माझ्याकडचा दिल्ली राईस संपलेला म्हणून बामती वापरला. पण त्यात मजा नाही)
कांदे उभे चिरून रुमालावर पसरून ठेवा

पुदिना धुवून बारीक चिरून ठेवा

चिकन धुवून त्याला दही, हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, थोडा पुदिना, दिड चमचा तंदुर मसाला लाऊन ठेवा
कांदा तेलात तळायला घ्या

दुसरीकडे पसरट भाड्यात, 3 चमचे साजुक तुपात तमालपत्र, मिरे, मसाला वेलची, साधी वेलची, काजू परतून घ्या

त्यावर निथळत ठेवलेले तांदूळ परता. आधण आणि मीठ टाकून भात मोकळा शिजवून घ्या

शिजलेला भात परातीत निवत ठेवा. याच वेळेस तमालपत्र, मिरे , मसाला वेलची, साधी वेलची वाटलं तर काढून टाका
पसरट मोठ्या पातेल्यात 3 चमचे साजूक तुप टाकून बारीक चिरलेला टॉमेटो परता

त्यावर मॅरिनेटेड चिकन चांगले परता

आता अर्धे चिकन बाऊलमधे काढून ठेवा आणि उरलेल्या चिकनवरती तळलेला 1/3 कांदा टाका
त्यावर अर्धा भाग भात पसरा, वर पुदिना1/3 भाग पसरा

त्यावर 1/3 कांदा, बाजुला काढून ठेवलेले चिकन, उरलेला कांदा, उरलेला पुदिना पसरा

आता बाजूला ठेवलेला भात पसरा

ज्या बाऊलमधे चिकन काढून ठेवलेले त्यात अर्धाकप दूध ओता. भांडे निपटून घ्या. त्यात केशर टाका. हे दूध बिर्याणीवरती पसरा
कणकेमधे पाणी घालून भिजवा


बिर्याणीवरती घट्ट झाकण ठेऊन झाकण-भांड याच्या फटीवर कणीक लावा. पाण्याचा एक हात फिरवा.
खाली जाड तवा ठेऊन बारीक आचेवर किमान एक ते दिड तास ठेवा. नंतर गॅस बंद करून 15 मिनिटांनी बिर्याणी ताटात वाढून घ्या
6-8 जणांसाठी भरपूर होईल.



Thursday, July 2, 2015

मसाला भेंडी

आज भेडीची जरा वेगळी भाजी केलीय. मस्त लागतेय :-)

साहित्य:
भेंडी पाव किलो
ओल्या खोबऱ्याचा चार इंचाचा तुकडा
भाजलेले दाणे मूठभर
मिरच्या 6
आलं एक इंचाचा तुकडा
हरभरा डाळीचे पीठ दोन मोठे चमचे
हळद अर्धा चमचा
हिंग, मोहरी फोडणीकरता
तेल 3चमचे
साखर अर्धा चमचा (ऑप्शनल)
चिंच एक इंचाचा गोळा
एक कांदा

कृती:
भेडी स्वच्छ धुवून, पुसून शेंडा बुडखा काढून एक एक इंचाचे तुकडे करून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या.
पॅन मधे बेसन पीठ कोरडेच भाजून घ्या. त्याचा कच्चेपणे जाईल इतपतच. ते मोठ्या बाऊलमधे काढून घ्या. त्यात चिरलेला कांदा घाला.
मिक्सरमधे मिरच्या, आलं, खोबरं, दाणे, चिंच सगळे उबडधोबड कोरडेच वाटून घ्या. हे वाटण कांदा, बेसन यात एकत्र करा. मीठ, साखर, हळद घाला.
आता पॅनमधे तेल गरम करून मोहरी, हिंग यांची फोडणी करा. मोहरी तडतडली की भेडीचे तुकडे टाका. छान परतून घ्या.  आता यात एकत्र केलेले वाटण, बेसन, कांदा घाला. पुन्हा छान परता. गॅस बारीक करून झाकण ठेवा. दोन मिनिटांनी झाकण काढून भाजी परता. पुन्हा झाकण ठेवताना खालून पुसून घ्या . भाजीत ते बाष्प पडू देऊ नका.
पुन्हा पाच मिनिटांनी हेच करा. आता झाकण न ठेवता पाच मिनिटं भाजी मंद गॅस वर परता.
तयार आहे खमंग मसाला भेंडी :-)

स्त्रोत : माझेच प्रयोग





Saturday, August 9, 2014

वालाचे बिरडे

भिजवून मोड आलेले वाल सोलून एक वाटी
ओले खोबरे अर्धा वाटी
लसूण 7-8पाकळ्या
कढिपत्ता
हिरवी मिरची एक
1कांदा बारीक चिरून
गूळ आवडीनुसार
2 अमसुलं
जिरेधणे पूड
हिंग, हळद, तिखट, मीठ, तेल, कोथिंबीर

कृती
प्रथम ओलं खोबरं, मिरची, लसूण एकत्र वाटून घ्यावे.
पसरट भांडयात तेल तापवत ठेवावे, त्यात हिंग, कढिपत्ता टाकावा. लगेच चिरलेला कांदा टाकावा, लगेच वाल टाकावेत. त्यावर हळद, तिखट टाकून पाच सात मिनिटं सगळे परतावे. मग जिरेधणे पूड टाकून पुन्हा परतावे. आता त्यात वाल भिजतील इतके पाणी टाकून छान उकळू दयावे. आता आच बारीक करून झाकण ठेवावे. वाल शिजले की त्यात वाटण, अमसुलं, गुळ, मीठ, कोथिंबीर टाकावी. छान उकळी आली की झाकण ठेउन मंद आचेवर पाच मिनिटं ठेवावे. नंतर आच बंद करावी.


Wednesday, March 26, 2014

मसूरची खिचडी

लागणारा वेळ: 
४० मिनिटे

लागणारे जिन्नस: 
तांदूळ २ वाट्या ( आंबेमोहोर सोडून कोणताही )
मोड आलेले मसूर १ वाटी
कांदे ३
सुके खोबरे किसलेले - अर्धी वाटी
हळद, तिखट, मीठ , हिंग चवी प्रमाणे
दालचिनी, २ तुकडे
मिरे ५-६
लवंग ४-५
लसूण ६-७ पाकळ्या
तेल
ओले खोबरे, कोथिंबीर, लिंबू, साजूक तूप, पापड, लोणचे सोबतीसाठी

क्रमवार पाककृती: 
तांदूळ धुवून निथळत ठेवावेत
मोड आलेले मसूर निवडून धुवून निथळत ठेवावेत
२ कांदे उभे चिरावेत, एक बारीक चिरावा
कढईत २ चमचे तेल टाकावे त्यात उभा चिरलेला कांदा मंद आचेवर परतावा. त्यातच दालचिनीचा १ तुकडा, सर्व लवंगा, सर्व मिरे, सर्व लसूण टाकावेत. कांदा चांगला तपकिरी झाला की ते सगळे मिक्सरमध्ये घ्यावे. आता त्याच कढईत सुके खोबरे भाजावे. चांगले लाल करावे. आता तेही मिक्सरमध्ये टाकावे. आता हे सगळे मिक्सरमधून बारीक करून घ्यावे, थोडे पाणी टाकून गुळगुळीत वाटावे.
एकीकडे ४-५ वाट्या पाणी गरम करत ठेवावे. दुसरी कडे जाड बुडाचे पसरट पातेले आचेवर ठेवावे. त्यात ४ चमचे तेल टाकावे, त्यात एक दालचिनीचा तुकडा टाकावा. त्याचा खमंग वास आला की त्यात हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा परतावा. आता त्यात मसूर टाकावेत. त्यात हळद टाकावी. २ मिनिट परतावे. आता त्यात तांदूळ टाकावेत तेही २ मिनिट परतावेत. आता त्यात तिखट घालावे, वाटलेला मसाला टाकावा आणि सर्व मंद आचेवर ५-७ मिनिट छान परतावे. खमंग वास सुटला पाहिजे.
मग त्यात आधनाचे पाणी घालावे.
चांगली उकळी आली की मीठ टाकून उकळू द्यावे. पाणी आळत आले की आच बारीक करून झाकण घालून खिचडी शिजू द्यावी. सधारण १० मिनिटांनी आच विझवावी. त्यानंतर ५ मिनिट वाफ खिचडीतच जिरू द्यावी.
वाढताना खिचडीची मूद, त्यावर ओले खोबरे, कोथिंबीर, साजूक तुप, लिंबू ठेवावे. बाजूला पापड, लोणचे वाढावे .

वाढणी/प्रमाण: 
वन मील असेल तर दोघांना, ताटातील एक प्रकार असेल तर चार जणांना
अधिक टिपा:
यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे परतणे. कांदा, खोबरे आणि नंतर संपूर्ण खिच्डी आधण घालण्याआधी परतणे. यात अजिबात कंटाळा करायचा नाही स्मित
फोटो नेक्स टाईम.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक सीकेपी पदार्थ

Saturday, December 22, 2012

बाकर वडी

लागणारा वेळ: 
४० मिनिटे 
 
लागणारे जिन्नस: 
बाकर (सारण) :
निवडून चिरलेली कोथिंबीर ४ वाट्या
आलं, लसूण वाटण एक चमचा
हिरवी मिरची वाटण २ चमचे
दोन कांदे उभे चिरून खरपूस तळून
एक वाटी किसलेले सुके खोबरे, भाजून
तीळ एक चमचा, भाजून
खसखस एक चमचा, भाजून
हळद अर्धा चमचा
तिखट एक चमचा
मीठ चवीप्रमाणे
बेसन एक चमचा
पारी साठी :
बेसन दोन वाट्या
कणीक ४ चमचे
मीठ चवीपुरते
तेल एक चमचा
पाणी आवश्यकते प्रमाणे
तळणासाठी :
तेल आवश्यकते नुसार
एक चमचा मैदा अर्धा वाटी पाण्यात भिजवून

क्रमवार पाककृती: 

सारणाचे सर्व साहित्य एकजिव करावे. हे सारण कोरडेच असल्याने थोडे मोकळे राहते.
पारीसाठीचे साहित्य एकत्र करून पु-यांसाठी भिजवतो तेव्हढे घट्ट भिजवून घ्या.
पोळीसाठी घेतो तेव्हढा गोळा घेऊन लाटा. फुलक्यांसाठी लाटतो तेव्हढे पांतळ लाटा. त्याला तेलाचा हात लावा. आता सारण एक यावर पसरा. सारणाचा थर साधारण एक इंच उंचीचा हवा. आता या सर्वाचा सारण दाबत दाबत रोल करा. शक्य तेव्हढा घट्ट रोल करा. धारधार सुरीला तेल लावून या रोलच्या ७-८ वड्या कापून घ्या.
अशा सर्व वड्या तयार करून घ्या.
तेल तापवत ठेवा. तेल तापले की या वड्यांना मैदा भिजवलेल्या पाण्याचे एक बोट मोकळ्या बाजूंवर फिरवा. आता आच मंद करून ह्या वड्या खरपूस तळून घ्या.
ह्या वड्या थंडीत ४-५ दिवसात संपवाव्या लागतात. ( खरं तर इतक्या चटपटीत लागतात की चार दिवस उरतच नाहीत स्मित ) दिवाळीत फराळाचे बरेच गोड होते. त्यावर या बाकर वड्यांचा उपाय जरूर करून बघा.
वाढणी/प्रमाण: 
३०-३२ बाकर वड्या होतील. 
 
अधिक टिपा: 
तळणाच्या तेलात ब-यापैकी सारण उतरते. त्यामुळे तळणीला तेल घालताना जरा जपून . राहिलेल्या तेलात मसाले भात करावा फर्मास होतो.

माहितीचा स्रोत: 
बालपणी शेजारी राहणा-या कामत काकी, अन त्यांच्याकडून शिकलेली आई

Thursday, November 8, 2012

मसुरचे खाट्टं

लागणारा वेळ:

१५ मिनिटे
      

लागणारे जिन्नस:

मसूर १ वाटी
हळद, तिखट, मीठ चवीप्रमाणे
चिंचेचा कोळ २ चमचे
लसूण ७-८ पाकळ्या
तेल ३ चमचे
कोथिंबीर एक मूठ
 

क्रमवार पाककृती:

आयत्या वेळेस करावयाचा पदार्थ
जाड बुडाच्या भांड्यात मसूर घ्यावेत. मध्यम आचेवर कोरडे भाजावेत. त्यांचा रंग लाल ऐवजी वाळूच्या रंगाचा होईल इतपतच भाजावेत. आच बंद करून मसूर धूवून घ्यावेत.
आता त्यात मसूर बुडतील अन त्यावर थोडे वर येईल इतके पाणी घालून उकळवत ठेवावे. उकळी आली की दहा मिनिटं झाकण ठेऊन शिजवावे. भाजलेले असल्याने दहा मिनिटात मसूर शिजतात.
आता त्यात हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ टाका. चिरलेली किथिंबीर घाला. कोथिंबीर मात्र भरपूर हवी.
दुसरीकडे लहान कढईत तेल घ्या. त्यात लसणाच्या पाकळ्या चेचून घाला. लसूण खरपूस लाल झाला की ही फोडणी उकळत्या मसूरात घाला. झाकण ठेऊन २ मिनिटं उकळवा. तयार आहे मसूराचे खाट्टं.

1352346647923.jpg
 

वाढणी/प्रमाण:

चौघांसाठी पुरेसे.
 

अधिक टिपा:

हे खाट्टं तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागतं. आमच्याकडे नॉनव्हेज केल्या नंतर दुस-या दिवशी हे करतात.
 

माहितीचा स्रोत:

पारंपारिक सी. के. पी. पदार्थ