Sunday, October 13, 2019

कणकेचा गार्लिक नान




कणीक दुधात  सैलसर भिजवली. गोळा थोडा मोठा घेतला. नुसतं लाटलं वरून लसूण कोथिंबीर. पोळपाटावरच उलटवलं खालची बाजू वर आली, तिला पाणी लावलं. अन पाण्याची बाजू नॉनस्टिकवर टाकली. मंद गॅसवर होऊ दिली. खालून लालसर झाली तशी गॅस मोठा करून गॅसवर वरची बाजू शेकली, फुलकी सारखी. उलटं करून खालचीपण जरा काळी केली. भाकरी, फुलकी, चपातीचं कॉंबो

Tuesday, October 1, 2019

गोळवणी ( गोळ्याची आमटी)



साहित्य -
1 कांदा बारीक चिरुन
1 टॉमेटो बारीक चिरून ( टॉमेटो आवडत नसेल तर चमचाभर चिंचेचा घट्ट कोळ)
तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, हिंग
गुळ अर्ध्या लिंबा एव्हढा
किसलेलं सुकं खोबरं मुठभर
लसूण 5-6 पाकळ्या
बेसन 5-6 चमचे
कोथिंबीर

कृती -
बारीक गॅसवर भांड्यात 2 चमचे तेलावर हिंग घालून कांदा परतत ठेवावा.
मिक्सीत किसलेलं सुकं खोबरं( न भाजता), लसूण, 1 च बेसन थोडं पाणी घालून बारीक करून घ्या.
कांदा गुलाबीसर झाला की टॉमेटो टाकून थोडं परता( टॉमेटो नको असेल तर पुढचं करा). आता त्यात हळद, तिखट, मीठ, गुळ, कोथिंबीर ( टॉ घातला नसेल तर आता चिंचेचा कोळ घाला) घाला. आता त्यावर वाटण घाला. थोडं परतून 2-3 पेले पाणी घालून बारीक गॅसवर उकळत ठेवा.
बाऊलमधे 5 चमचे बेसन घ्या. तेव्हढ्याला लागेल इतकं तिखट हळद मीठ घाला. दोन चमचे उकळत ठेवलेले सांभाळून घाला. एक चमचा तेल टाकून बेसन घट्ट गोळा एकत्र करा. लागलं तर 1-2 चमचे पाणी घाला. पुऱ्यांना असते तेव्हढं घट्ट भिजवा. आता त्याचे 4 भाग करून एकेकाची त्याची जाड शेवेसारखी गुंडाळी करा.  आणि उकलत असलेल्या आमटीत मण्या एव्हढे तुकडे करत टाकत रहा. कंटाळा येई पर्यंत किंवा गोळा संपे पर्यंत टाकत रहा.
आता झाकण ठेऊन पाच मिनिटं शिजू दे. झाकणावर पाणी ठेवा. म्हणजे आमटी उतू जाणार नाही. पाच मिनिटांनी चपाती/ भाताबरोबर ओरपा. सोबत भाजलेला पापड असेल तर बहारच.


Friday, August 16, 2019

वालाची खिचडी



साहित्य:

भिजवून मोड आलेले सोललेले वाल एक वाटी

तांदुळ एक वाटी

ओलं खोबरं पाव वाटी

लसूण 7-8 पाकळ्या

हिरवी मिरची एक

कांदे दोन

हिंग, हळद, तिखट, मीठ

कोथिंबीर, लिंबु/दही
कृती

कांदे बारीक चिरून घ्यावे.

निम्मा कांदा, खोबरं, लसूण, मिरची सगळं बारीक वाटावं थोडं पाणी घालून.

पातेल्यात 3-4 चमचे तेल घालून ते चांगलं गरम झालं की गॅस बारीक करून त्यात हिंग, हळद घालून वर वाल परतावेत दोन मिनिटं, मग त्यावर कांदा घालून तोही परतावा दोन मिनिटं. आता धुतलेले तांदूळ परतावेत दोन मिनिटं. मग वाटण घालून दोन मिनिटं परतावं.

आता आधणाचं पाणी घाला. तिखट, मीठ घाला. गॅस मोठा करून छान उकळू द्या. पाणी थोडं आळलं की कोथिंबीर टाकून गॅस बारीक करून झाकण ठेऊन खिचडी शिजू द्या. साधारण 7-8 मिनिटं.


वाढताना सोबत ओलंखोबरं, कोथिंबीर, लिंबू वाढा. पोह्याचा पापड सोबत असेल तर लिंबा एेवजी दही  :)

Thursday, May 2, 2019

अप्पे


मूग, हरबरा, उडिद, तूर, मसूर सगळ्या डाळी 5-5 चमचे रात्री बिझत घालणे.
एक वाटी इडली रवा रात्री भिजत घालणे.
सकाळी सगळं भरडसर वाटून घेणे.
मका, मटार 5-5 चमचे घेऊन ते पाण्यात उकळत ठेवणे.
एका बाऊलमधे भरड वाटलेल्या डाळी, भिजवलेला इडली रवा एकत्र करावे.
कांदा, कांदापात, सिमला मिरची सगळे बारीक चौकोनी चिरून घ्यावे. गाजर किसून घ्यावे. हे सगळे 5-5 चमचे पिठात घालावे. आता उकडलेले मटार, मका दाणे पाण्यातून काढून तेही पिठात टाका.
7-8 मिरे खरडून घ्या. ते पिठात टाका.
हिरव्या मिरच्या 2-4 बारीक चिरून पिठात टाका.
आता पिठात मीठ घालून, हवे तसे पाणी घालून सरसरीत भिजवा. फार पांतळ नको.
अर्धातास झाकून ठेवा.

नंतर अप्पे पात्रात थोडे तेल टाकून 1-1 चमचा मिश्रण टाकून झाकण ठेऊन 3-4 मिनिटं बारीक गॅसवर शिजू द्या . झाकण काढून पलटवा,  गॅस मोठा करून 2 मिनिट ठेवा. मग काढून सॉर, चटणी या सोबत सर्व्ह करा.



Tuesday, March 26, 2019

साबुदाणा खिचडी



एक कप साबुदाणा घेऊन तो पाण्यात 2-3 दा धुवून घ्यावा. सगळा स्टार्च निघू  पाणी स्वच्छ व्हायला हवं. मग बाऊलमधे साबुदाणा आणि अर्धा कप दूध भिजत ठेवावं रात्रभर.
सकाळी उठल्यावर आधी साबुदाणा हाताने मोकळा करून घ्यावा.
एक उकडलेला बटाटा मध्यम फोडी करून घ्या. दोन मिरच्या बारीक चिरा. पाव कप भाजलेल्या दाण्याचे कुट करून घ्या.

आता साबुदाण्यात कुट, मिरची, चवी पुरते मीठ, पाव चमचा साखर घालून सगलं मिक्स करा.

मोठी कढई तापत ठेवा. दोन चमचे तेल/ तूप  टाका. अर्धा चमचा जिरे टाकून ते तडतडले की बटाटे टाका. मोठ्या गॅसवर ते परता. परतत असताना कढईत सगळीकडे तेल/ तूप लागेल असे पहा. दोन मिनिटांनी साबुदाणा मिक्स घाला. गॅस मोठाच ठेऊन भरभर परता. ही स्टेप महत्वाची. सगळी खिचडी नीट परतली गेली की गॅस बारीक करून झाकण ठेवा. एक छान वाफ येऊ द्यात. मग झाकण काढून पुन्हा एकदा परतून गॅस बंद करा.


वाढताना वरून ओलं खोबरं टाका