Monday, December 3, 2018

थंडी स्पेशल उंधियु

थंडीत वेगवेगळ्या भाज्या बाजारात येतात, त्यात सुरती पापडी नावाची शेंगाभाजी येते. फिकट पोपटी रंगाची, कोवळी पापडी असते ही. ती या उंधियुची मेन तारका. पण तरीही ही मल्टिस्टार रेसिपी. खरं तर वन डिश मिल सारखी नुसतीच खायची. अगदीच वाटलं तर सोबत पुरी, जिलेबी. किंवा मग नुसतच उंधियु आणिि नंतर दही भात. चला तर पदर, ओढणी, कंबर बांधून कामाला लागा. अतिशय पेशन्स वाली रेसिपी आहे हं ही.
साहित्य
पाव किलो सुरती पापडी
100 ग्रॅम प्रत्येकी : मटार, तूर दाणे, लिलवे(ओल्या वालाच्या शेंगांमधले वाल), ओला हरभरा, ओले वा भिजवलेले शेंगदाणे, सुरण, रताळे, बटाटे, गराडू ( आतून किरमिजी रंग असलेला एक कंद)
लांब वांगी दोन, छोटी गोल वांगी 4-6
मेथीची पाने दोन वाट्या
कोथिंबीर एक वाटी
मिरच्या 7-8
लसूण पाकळ्या 7-8
किसलेलं सुकं खोबरं चार चमचे
दाण्याचे कुट दोन चमचे
बेसन पाव वाटी + थोडे
कणीक 4 चमचे
ओवा दोन चमचे
तिखट, हळद, हिंग, मीठ चवीनुसार
तेल भरपूर whoa ही भाजी वाफेवरच करायची असल्याने तेल अंमळ जास्ती लागते. शिवाय सुरण, गराडू वगैरे कंद असल्याने तेल आवश्यक असतं. तरीही आपापल्या आवडीनुसार कमी करू शकता.
पूर्वतयारी:
सुरती पापडी निवडून घ्यावी.
बाकी सर्व दाणे शेंगांमधून सुटे करून धुवून घ्यावेत.
सर्व कंद स्वच्छ धुवून, सालं काढून एक इंच चौरस चिरून पाण्यात ठेवावेत.
लांब वांगी दोन भाग करून जाडसर चिरून पाण्यात ठेवावी. गोल वांगी देठं काढून मधे भरल्या वांग्यासाठी काप देतो तशी चिरून पाण्यात ठेवावी.
मेथीची पाने, चिरून धुवून निथळत ठेवावी.
कृती :
कढईत वाटी, दिड वाटी तेल तापत ठेवावं. चिरलेल्या मेथीमधे 4-5 लसूण चिरून घालावेत, तिखट, हळद, हिंग, मीठ टाकावे, कणीक घालावी, पाव वाटी बेसन घालावे. सगळे मिक्स करावे, लागले तर थोडे पाणी घालून घट्ट भिजवा. आता हाताला तेल लावून त्याची मुठियं (मुठीमधे मिश्रण घेऊन दाबावं, मुठी सारखे तयार होते ते मुठिय) करून घ्यावीत.
तेल तापलं की त्यात ही मुठियं छान खरपूस तळून बाजुला ठेवावी.
आता मोठं, जाड बुडाचं भांड गॅसवर चढवा. तळणाचं तेल 4 डाव कढईतून पातेल्यात घ्या. त्यात ओवा टाका. ओवा तडतडला की त्यात सुरती पापडी टाका, सगळे दाणे घाला आणि मंद गॅसवर सगळं परता. आता त्यावर परात ठेवा अन परातीमधे पेलाभर पाणी घाला.
आता गोल वांगी भरण्यासाठी सारण तयार करा. सुकं खोबरं, 3-4 लसूण, एक हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घ्या. त्यात चमचाभर बेसन, दाण्याचे कुट, तिखट, हळद, मीठ , एक चमचा तेल घालून सगळं एकत्र करा. ते वांग्यांमधे भरा.
आता परात बाजुला करून(पाणी आत पडणार नाही याची काळजी घेत) सगळं हलवा. त्यात भरलेली वांगी, कंद प्रकारातले सगळे तुकडे घाला. वांग्याचे सारण उरलं असेल तर तेही घाला. पुन्हा सगलं नीट हलवा. अन परात ठेवा. परातीत पाणी आहे ना चेक करा.
आता कोथिंबीर, 3-4 लसूण, 3-4 मिरच्या मिक्सरमधून फिरवून घ्या. थोडं पाणी टाकून छान पेस्ट करा. कढईतलं तेल बाजुला करा, 3-4 चमचे तेल कढईत ठेवा. कढई पुन्हा तापत ठेवा. त्यात लगेचच कोथिंबीरीचे वाटण परता. तेल सुटू लागलं की गॅस बंद करा.
पातेल्यातल्या सगळ्या भाज्या पुन्हा एकदा परता.
यातला बटाटा, सुरण शिजत आला की त्यात कोथिंबीरीची ग्रेव्ही टाका. परता. मुठियांमधले 3-4 मुठियं जरा चुरून भाज्यांवर पसरा. अंदाजाने मीठ घाला, उरलेली मुठियंही घाला. सगळे पुन्हा एकदा नीट हलवा. वर परात ठेवा. आता त्यावर पाणी नको.
दर पाच मिनिटांनी सगळे नीट हलवा.चव चाखून बघा, तिखट, मीठ अॅडजेस्ट करा.
दहा मिनिटांनी हलवून परात झाकून ठेवा अन दोन मिनिटांनी गॅस बंद करा.
दहा मिनिटांनी झाकण काढा अन बाऊल मधे घेऊन स्वाद घ्या.