Saturday, September 2, 2017

नारळीभात

साहित्य:

एक पूर्ण खोवलेला नारळ

दोन वाट्या तांदूळ, शक्यतो बासमती तुकडा किंवा सुरती कोलम

किसलेला गूळ दोन वाट्या ( फार गोड हवा असेल तर प्रमाण वाढवा)

लवंगा 2-4

जायफळ किसून अर्धा चमचा

सात आठ भिजवून सोलून तुकडे केलेले बदाम

कृती:

तांदुळ धुवून निथळत ठेवायचे.

नारळ खवणून मिक्सरमधून एक वाटी पाणी घालून वाटून घ्यायचा. मग त्यातलं दूध पिळून काढायचं. हे जाड दूध. मग पुन्हा चोथ्यात एक वाटी पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं. मग पिळून दुध काढायचं अन चोथा बाजुला ठेवायचा. हा चोथा भातासाठी वापरणार नाही आहोत. त्याचा उपयोग शेवटी सांगते. तर हे दुसरं दूध पांतळ दूध. दोन्ही दुधं स्वतंत्र ठेवा.

आता तुपावर दोन लवंगा टाकायच्या. गॅस बारीक ठेवा. त्यात बदामाचे काप घाला. बदामाचा खमंग वास आला की त्यात तांदूळ टाकायचे. छान लालसर परतून घ्यायचे. मंदाग्निवर.

आता त्यात नारळाचे पांतळ दूध टाकायचे. आणि गॅस मोठा करून छान रटरटू द्यायचं. आता गॅस बारीक करून जाड दूध टाकायचं अन झाकण ठेऊन भात बोटमोड्या शिजवून घ्यायचा.

भात पूर्ण शिजला की,भांड्या खाली तवा ठेवा. तांदळाच्या समप्रमाणात किसलेला गूळ टाकायचा, जायफळ किसून घालायचं. आणि उलथण्याच्या उलट्या बाजुने हलवायचा, नाजूकपणे. जसजसा गूळ वितळत जाईल तसतसे हे हलवणं सोपं जाईल. गूळ सगळीकडे मिसळला की पुन्हा झाकण घालून एक वाफ येऊ देत.

तयार आहे नारळी भात. यात नारळाचा चोथा नसल्याने हा भात अतिशय सुरमट होतो. दुसऱ्या दिवशी हा नारळीभात अफलातून लागतो :)

No comments:

Post a Comment