Tuesday, November 29, 2016

मसूरची खिचडी

साहित्य  :
तांदूळ २ वाट्या ( आंबेमोहोर सोडून  कोणताही )
मोड आलेले मसूर १ वाटी
कांदे ३
सुके खोबरे किसलेले - अर्धी वाटी
हळद, तिखट, मीठ , हिंग चवी प्रमाणे
दालचिनी, २ तुकडे
मिरे ५-६
लवंग ४-५
लसूण ६-७ पाकळ्या
तेल
ओले खोबरे, कोथिंबीर, लिंबू, साजूक तूप, पापड, लोणचे सोबतीसाठी

कृती  :
तांदूळ धुवून निथळत ठेवावेत
मोड आलेले मसूर निवडून धुवून निथळत ठेवावेत
२ कांदे उभे चिरावेत, एक बारीक चिरावा
कढईत २ चमचे तेल टाकावे त्यात उभा चिरलेला कांदा मंद आचेवर परतावा. त्यातच दालचिनीचा १ तुकडा, सर्व लवंगा, सर्व मिरे, सर्व लसूण टाकावेत. कांदा चांगला तपकिरी झाला की ते सगळे मिक्सरमध्ये घ्यावे. आता त्याच कढईत सुके खोबरे भाजावे. चांगले लाल करावे. आता तेही मिक्सरमध्ये टाकावे. आता हे सगळे मिक्सरमधून बारीक करून घ्यावे, थोडे पाणी टाकून गुळगुळीत वाटावे.
एकीकडे ४-५ वाट्या पाणी गरम करत ठेवावे. दुसरी कडे जाड बुडाचे पसरट पातेले आचेवर ठेवावे. त्यात ४ चमचे तेल टाकावे, त्यात एक दालचिनीचा तुकडा टाकावा. त्याचा खमंग वास आला की त्यात हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा परतावा. आता त्यात मसूर टाकावेत. त्यात हळद टाकावी. २ मिनिट परतावे. आता त्यात तांदूळ टाकावेत तेही २ मिनिट परतावेत. आता त्यात तिखट घालावे, वाटलेला मसाला टाकावा आणि सर्व मंद आचेवर ५-७ मिनिट छान परतावे. खमंग वास सुटला पाहिजे.
मग त्यात आधनाचे पाणी घालावे.
चांगली उकळी आली की मीठ टाकून उकळू द्यावे. पाणी आळत आले की आच बारीक करून झाकण घालून खिचडी शिजू द्यावी. सधारण १० मिनिटांनी आच विझवावी. त्यानंतर ५ मिनिट वाफ खिचडीतच जिरू द्यावी.
वाढताना खिचडीची मूद, त्यावर ओले खोबरे, कोथिंबीर, साजूक तुप, लिंबू ठेवावे. बाजूला पापड, लोणचे वाढावे .