Friday, September 14, 2012

मुगाचे बिरडे

लागणारा वेळ:
२५ मिनिटे
       
लागणारे जिन्नस:
प्रथम काही गोष्टी स्पष्ट कराव्यात असे वाटले. सी. के. पीं. मध्ये मूग, वाल आणि चवळी यांचा विशिष्ठ पद्धतीने केलेल्या रश्श्याला "बिरडं" ही उपाधी स्मित लावली जाते.

लागणारे जिन्नस : मूग - आदल्या दिवशी सकाळी भिजत घालायचे. रात्री पातळ फडक्यात बांधून ठेवायचे. दुसर्‍या दिवशी कोमट पेक्षा थोडे गरम पण उकळत्यापेक्षा गार अशा पाण्यात मोड आलेले मूग टाकावेत. १० मिनिटांनी मोड तुटणार नाहीत ही काळजी घेत हलक्या हाताने थोडे चुरावेत. मग भांडे हळू ( पीठ चाळताना जशी चाळणी हलवतो तसे) हलवत त्यातले पाणी दुसर्‍या भांड्यात ओतत जावे. पाण्याबरोबर सालंही सुटत जातात. असे २-३ दा करत बहुतांशी साले सुटून जातात. मग न सुटलेले मूग सोलावेत. प्रत्येक मूग सोललेलाच असला पाहिजे. बिरड्यात साल तरंगताना दिसले तर आमची सी. के. पी. जात बुडते डोळा मारा
तर असे पूर्ण सगळे

१. सोललेले मूग २ वाट्या
२. अर्धा खोवलेला ओला नारळ ( यात खोबर्‍याची तपकिरी साल थोडे जरी आले तरी जात बुडते, लक्षात घ्या )
३. १०-१२ लसणाच्या पाकळ्या
४. १/२ इंच आलं
५. दोन बारीक चिरलेले कांदे
६. लिंबा एवढा चिंचेचा गोळा / कैरी मिळाल्यास मध्यम आकाराची अर्धी कैरी -चार भाग करून
७. चिंचेच्या निम्म्याने गूळ
८. थोडी कोथींबीर
९. तेल, हळद, हिंग, तिखट, धणेजिरे पूड, मीठ चवीनुसार ( यातही तिखट = सी. के. पी. तिखट =लाल संकेश्वरी मिरच्या [डेखं तोडलेल्या] + धणे + बडिशेप यांचे खास प्रमाण )
 
क्रमवार पाककृती:
१. चिंच अर्ध्यावाटी पाण्यात भिजत घालावी.
२. ४ मोठे चमचे तेल तापवून त्यात हिंगाची फोडणी करावी. त्यात आधी कांदे परतावेत.
३. कांदे लालसर झाले की त्यात मूग टाकावेत, त्यात हळद, तिखट, धणेजिरे पूड टाकावे. हे सर्व मंद गॅसवर किमान ७-१० मिनिटं परतावे.
४. हे परतणे चालू असताना, ओले खोबरे व लसूण एक कप पाण्यात बारीक वाटून घ्यावे. चिंचेचा कोळ काढून घावा.
५. आता परतलेल्या मूगात २ कप पाणी घालावे व २ उकळ्या आल्यावर झाकण ठेऊन मूग शिजू द्यावेत.
( अरेच्च्य्या एक सांगायचं राहिलच. झाकण खोलगट घेऊन त्यात पाणी घालावे, अन अजून पाणी लागले तर हे वरच्या झाकणातलेच पाणी टाकावे नाही तर पुन्हा जात बुडण्याचा संभव आहेच )
६. मूग शिजल्यावर त्यात वाटण, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, चिरलेली कोथींबीर टाकून एक उकळी आणावी.
७. बाजारात कैर्‍या मिळत असतील तर चिंचे ऐवजी कैरीच वापरली पाहिजे असा ही दंडक आहे. ( मला स्वतःला असे कैरी घातलेले बिरडे जास्ती आवडते हे खरे )

हे सी.के.पी. पद्धतीचे मूगाचे बिरडे !
हुश्श्य !
आता माझ्या या सगळ्या लेखनाबद्द्ल मला जाती बहिष्कृत करण्यात आलं असेल बहूदा. आता याला जबाबदार तुम्ही सगळे !
 
वाढणी/प्रमाण:
सी.के.पी. व्यव-ती असल्यास २ व्यव-तींना पुरेल. अन्यथा चार व्यव-तींना पुरेल
 
अधिक टिपा:
मी स्वतः सी.के.पी. आहे. अन सी.के.प्यांच्या स्वयंपाका बद्दल मला सार्थ अभिमान आहे तरी हे लिहिले आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आधीच मनापासून माफी मागते__/\__
 
माहितीचा स्रोत:
माझी सी. के. पी. जात :)

Tuesday, September 4, 2012

व्हेज तंदूरी

लागणारा वेळ:
 
३० मिनिटे
      
लागणारे जिन्नस:
 
फ्लॉवरचे मोठे ४-५ तुरे
४ मध्यम आकाराचे बटाटे
१ मोठे गाजर
२ सिमला मिरच्या
४ कांदे
२ टॉमेटो
पनीरचे ७-८ मोठे तुकडे
घट्ट दही पाव किलो
आलं १/२ इंच
लसून ४ पाकळ्या
मिरच्या चार
चाट मसाला १ चमचा
मीठ चवी प्रमाणे
थोडे बटर
 
क्रमवार पाककृती:
 
आलं, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात.
दही, आलं-लसूण्-मिरच्यांचे वाटण, मीठ, १/२ चमचा चाट मसाला सगळे एकत्र करावे.
बटाटे सोलून त्याचे ४ भाग करावेत.
गाजरं सोलून त्यांचे १-१ इंचाचे तुकडे करावेत.
बटाटे, गाजर, फ्लॉवर जरा जास्त पाण्यात उकडत ठेवावे. त्यात चिमुटभर मीठ आणि १/२ चमचा साखर टाकावी. १० मिनिटं उकडावे.
सिमला मिरच्यांचे १-१ इंचाचे तुकडे करावेत. टॉमेटोचे ४ भाग करावेत.
कांद्याचे ४ भाग करावेत ( मूळाकडचा भाग काढू नये. भाजताना बरे पडते.)
आता मसाला लावलेया दह्यात सर्व भाज्या घालाव्यात. सर्व भाज्यांना मसाला नीट चोळावा.
४ तास मिश्रण बाहेरच मुरवत ठेवावे.
ओव्हन १०० तापमानाला १० मिनिटं प्री हिट करावा.
प्रत्येक भाजीचा एक तुकडा येईल अशा पद्धतीने फॉईलमध्ये भाज्या घ्या. त्यावर ए छोटा चमचा (भातुकलीतला) बटर टाका. फॉईल गुंडाळून ओव्हनमध्ये १५-२० मिनिटे शिजवा.
लोखंडाची कढई तापवा. त्यात प्रत्येक पुडीतल्या भाज्या मोठ्या आचेवर भाजा.
देताना चिमुटभर चाट मसाला भुरभुरवा.
 
वाढणी/प्रमाण:
 
सहा जणांना पुरावे.
 
अधिक टिपा:

बटाटा, फ्लॉवर, गाजर फार शिजवू नका, नाहीतर गाळ होईल.
दही शक्य तेव्हढे घट्ट घ्या. मी चक्क रात्री बांधून ठेवते फडक्यात, चक्क्यासारखे.
एका वेळेस एकाच पुडीतल्या भाज्या कढईत टाका. फार परतू नका. जरा जळकट होऊ द्या. शेवटचा हप्ता स्वतः साठी ठेवा. कारण त्याला जास्त छान जळकट चव येते डोळा मारा
 
माहितीचा स्रोत:
 
माझे प्रयोग

Saturday, September 1, 2012

शेंगदाण्याची सोलापुरी पद्धतीची झटपट चटणी

लागणारा वेळ:

 
१० मिनिटे

लागणारे जिन्नस:

भाजलेले शेंगदाणे १ किलो ( न सोललेले )
लसूण पाकळ्या १०
तिखट ५ चमचे
मीठ १ चमचा
शेंगदाण्याचे तेल 4 चमचे
5-6 काजू
 

क्रमवार पाककृती:

मूळ सोलापूरी शेंगदाणे आकाराने मोठे अन तेलाचे प्रमाण जास्ती असणारे असतात. इतरत्र मिळणार्‍या शेंगदाण्यांना तेव्हढे तेल सुटत नाही. त्यामुळे इतरत्र मिळणार्‍या शेंगदाण्याची चटणी वेगळी होते. त्यावर शोधून काढलेला हा पर्याय आहे.
भाजलेले शेंगदाणे (सालासकट), लसूण, तिखट, मीठ आणि 2 चमचे शेंगदाणा तेल कढईत घ्यावे.

1345605193620.jpg

मंद गॅसवर थोडा वेळ परतावे. चांगले खरपूस झाले की गॅस बंद करावा.

1345605219024.jpg

गरम असतानाच हे सर्व मिक्सरमध्ये "विप"वर दोनचारदा फिरवावे. अधमुरे वाटलेले थोडे काढून ठेवावे.

1345605241526.jpg

यात लसून आला असेल तर तो काढून पुन्हा मिक्सरमध्ये घालावा. काजू टाकावेत.
आता मिक्सरवर हे बारीक वाटावे.

1345605266692.jpg

आता मघाशी काढून ठेवलेले अधमुरे वाटलेले पुन्हा मिक्सरमध्ये घालावे. त्यात दोन चमचे शेंगदाणा तेल टाकावे. अन मिक्सर पुन्हा एकदा फिरवावा.
तयार आहे खमंग, झणझणीत शेंगदाण्याची चटणी.

1345605311503.jpg

अर्धातास तशीच ठेवली की असे तेल सुटते. अन तोंपासु दिसते स्मित

1345605291570.jpg
 

वाढणी/प्रमाण:

झेपेल तेव्हढे ;)

अधिक टिपा:

यात शेंगदाणा तेलच वापरावे तरच चव पर्फेक्ट येते. इतर तेलांनी ती मजा येत नाही.
या चटणीत खाताना दही घालून खावे. एकतर चवही मस्त लागते अन पचायलाही बरे पडते डोळा मारा
माहितीचा स्रोत:
माझा नवरा सोलापूरला राहिलेला. पुण्यात अनेक वर्षे राहिला तरी त्याला सोलापूरचे भारी प्रेम :( लग्न झाल्यापासून सोलापूरच्या चटणीची अती कौतुकं ऐकली. अन माझी नेहमीच्या पद्धतीची चटणी नाकं मुरडत खालेली. मग एकदा सोलापूरची चटणी बघितली, खाल्ली. अन मग केला हा प्रयोग. आता अगदी नावाजत खातो :)