Saturday, July 21, 2012

कारल्याच्या कुरकुरीत काचर्‍या

लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
कारली २
कांदे २
मिरच्या ६
तीळ २ चमचे
कोथिंबीर
लसूण १० पाकळ्या
तेल २ चमचे
मोहरी १/२ चमचा
हिंग २ चिमुट
हळद पाव चमचा
मीठ चवीप्रमाणे
साखर आवडत असल्यास १ चमचा
क्रमवार पाककृती:
कारल्याचे उभे चार भाग करून पांतळ पांतळ चिरून घ्यावी. त्याला थोडे मीठ लावून त्यावर पाण्याचा हबका मारून बाजूला ठेवावी.
कांदे चार भाग करून पांतळ पांतळ चिरून घ्यावेत.
लसूण उभा पांतळ पांतळ चिरून घ्यावा.
मिरच्या उभ्या पांतळ पांतळ चिरून घ्याव्यात. ( या कृतीला कृपया "पांतळ पांतळ कारली " म्हणू नये या चिरण्यावर या भाजीचा कुरकुरीतपणा अवलंबून असतो, त्यामुळे तेव्हढे कष्ट हवेतच. )
आता कारली स्वच्छ धुवून घ्यावीत. घट्ट पिळून घ्यावीत. ( हे घट्ट पिळणे महत्वाचे. मेथीही अशी घट्ट पिळून केली की वेगळी चव येते. तज्ज्ञांनी यामागचे शास्त्रीय कारण सांगावे )
पॅनमध्ये तेल तापत ठेवावे. मोहरी टाकावी. ती तडतडली की लसूण टाकावा. तो लालसर झाला की मिरच्या टाकाव्यात. हिंग, हळद टाकावी. तीळ टाकावेत.लगेच कारली टाकावी.
कारली थोडी परतली की कांदा टाकावा. चवीपुरते मीठ टाकून मंद गॅसवर परतत ठेवावे. (झाकण ठेऊ नये - भाजीला पाणी सुटेल. )
किमान २० - ३० मिनिटे तरी मंद आचे वरती ही कारली मधून मधून परतत ठेवावी.
खुरकुरीत होत आली की आवडत असल्यास साखर घालावी. ( कांदा भरपूर असल्याने त्याची गोडी बहुदा पुरेशी होते. परंतु ज्यांना आवडत असेल त्यांनी साखर घालावी. )साखर घातल्यावर, ती विरघळली की लगेच गॅस बंद करावा, नाही तर भाजीला काळसर रंग येतो.
तयार आहेत कारल्याच्या कुरकुरीत काचर्‍या. ही  भाजी गार झाली कि गारच खावी, तरच  कुरकुरीत लागते.

वाढणी/प्रमाण:
खाल, त्या प्रमाणे :)
अधिक टिपा:
ही भाजी आंबटवरण भाताबरोबर फार फर्मास लागते.
कोरडी असल्याने २-३ दिवसही टिकते. त्यामुळे प्रवासात नक्की करते मी.
माहितीचा स्रोत:
पारंपारिक, काही माझे प्रयोग.

तोंडल्याची कोशिंबीर

लागणारा वेळ:
१५ मिनिटे
 
लागणारे जिन्नस:
तोंडली १० ते १२
दाण्याचे कूट
३ हिरव्या मिरच्या
मीठ, साखर चवीप्रमाणे
दही वाटीभर
फोडणीसाठी २ चमचे तेल
अर्धा चमचा जिरे
चिमुटभर हिंग
४-५ कढिपत्त्याची पाने
कोथिंबीर
 
क्रमवार पाककृती:
तोंडल्याची दोन्ही बाजुची टोकं काढून ४ भाग करुन घ्यावेत.
ग्राईंडरमध्ये तोंडल्याचे तुकडे, मिरच्या भरड वाव्यात. अगदी जाडसरच ठेवावे.
आता हे कुकरमध्ये भाताप्रमाणे शिजवावे.
कुकर गार झाल्यावर त्यात दही, मीठ, साखर, कोथिंबीर, दाण्याचे कूट घालावे. वरुन जिरे, हिंग, कढिपत्त्याची फडणी द्यावी.
तयार आहे तोंडल्याची कोशिंबीर.
 
वाढणी/प्रमाण:
४ जणांसाठी
 
अधिक टिपा:
काकडीच्या कोशिंबीरीसारखीच चव लागते. तोंडलीची भाजी मुलं खात नाहित, किंवा काकडी मिळत नाही तेव्हा जरुर करुन बघा
 
माहितीचा स्रोत:
आई

फोटो :

भरडलेली तोंडली
1336902933866.jpg
साहित्य
1336902966147.jpg
तोंडल्याची कोशिंबीर
1336902995959.jpg

गवार ढोकळी

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
गवारीच्या कोवळ्या शेंगा ( गावरान गवार नको ) - १०० ग्रॅम
गव्हाचे पीठ - १ वाटी
हरभराडाळीचे पीठ - २ चमचे
हळद - आर्धा चमचा
तिखट १ चमचा ( हवे असल्यास वाढवले तरी चालेल )
गूळ - एक मोठा खडा
मीठ चवीनुसाए
ओवा - १ चमचा
तेल - ४ चमचे
पाणी
क्रमवार पाककृती:
गवारीच्या शेंगाची देठं आणि टोकं काढून टाका. शेंगा लहान असतील तर मोडू नका. मोठ्या असतील तर त्यांचे तोडून दोन भाग करा. आता एक लिटर पाण्यात गवार घालून गॅसवर शिजत ठेवा. उकळी आल्यावर गॅस बारीक करून झाकण ठेऊन शिजू द्या.
कणीक, बेसन एकत्र करा. त्यात पाव चमचा हळद, आर्धा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, थोडे तेल टाकून पाणी घालून चपात्यांसाठी भिजवतो तशी कणीक भिजवून घ्या.
गवार शिजत आली का ते पहा. शिजायला लागली की तिचा रंगही बगलतो अन ती सॉफ्ट दिसायला लागते. गवार शिजत आली की त्यात पाव चमचा हळद, आर्धा चमचा तिखट, गुळाचा मोठा खडा अन चवीपुरते मीठ घालून उकळू द्या. पाणी कमी झाले असल्यास त्यात २-३ भांडी पाणी घालावे.
आता कणकेचे गोळे पांतळ लाटा- फुलक्यासारखे पांतळ लाटावेत.
त्याचे शंकरपाळ्यासारखे काप करून गवारीसह उकळणार्‍या पाण्यात हे काप सोडा.
आता गॅस बारीक करून सगळे एकदा नीट ढवळून झाकण घालून ५ - ७ मिनीटं शिजू द्यात.
छोट्या कढईत ४ चमचे तेल घेऊन त्यात फक्त ओवा टाका. चांगला तडतडला की याची फोडणी गवार ढोकळी वर ओता. ( हे सांभाळून करावे, हातावर फोडणी उडण्याची भीती असते.) पुन्हा झाकण ठेऊन ५ मिनिटं वाफ येउ द्या. मग गॅस बंद करा. पाच मिनिटांनी झाकण काढून गरम गरम गवार ढोकळी शेंगदाणा तेल ( कच्चेच ) टाकून खावी .
वाढणी/प्रमाण:
दोघांना भरपूर होते. इतर काहीही लागत नाही.
अधिक टिपा:
फोडणी देताना भांड्यावरचे झाकण कमीत कमी बाजूला करावे, म्हणजे सगळा वास आतल्या आत जिरतो.
ही सकाळी किंवा रात्रीही, संपूर्ण जेवण म्हणून पुरते.
गूळ मात्र व्यवस्थित असावा लागतो.

gavar dhokali.jpg

"बटर आटा रोटी"

लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
कणीक १ वाटी
तेल १ चमचा
दही २ चमचे
अर्धा चमचा बटर
मीठ चवीनुसार
पाणी गरजे नुसार
नॉनस्टीक तवा आणि कालथा
 
क्रमवार पाककृती:
कणीक दही, मीठ, तेल टाकून सैलसर भिजवा.
१५ मिनिटं झाकून ठेवा.
थोडा मोठा गोळा घेऊन ( नेहमीच्या चपातीच्या गोळ्याच्या दिडपट ) नेहमीसारखी घडीची चपाती लाटा.






पोळपाटावरच असताना तिच्या वरच्या बाजूला पाणी लावा ( भाकरीला लावतो तसे )



ही ओली बाजू नॉनस्टीक तव्यावर टाका.



फोड येऊ लागले की कालथा (उलथणे) पाण्यात भाजवून रोटी उलटी करा. 



ही बाजू खमंग भाजा. कालथ्याने सोडवून घ्या पण उलटू नका. आता वरच्या बाजूला थोडे बटर लावा.



ही बटरची बाजू गॅसवर टाका, अन खरपूस भाजा.



बटर आटा रोटी तयार !

बटर आवडत नसेल तर ते न लावता नुसतीच गॅसवर भाजा.
वाढणी/प्रमाण:
२ ते ३ रोट्या होतील.
 
अधिक टिपा:
खुप लोकं येणार असले तर आधी सगळ्या रोट्या नुसत्या तव्यावर भाजून डब्यात ठेवाव्यात. आयत्या वेळेस बटर किंवा नुसत्याच लावून गॅसवर भाजून सर्व्ह कराव्यात .
 
माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग :)

चायनीज फोडणीचा भात

लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
शिळा भात : २ वाट्या
सिमला मिरची : १
टॉमेटो : १
लसूण : ४-५ पाकळ्या
कांदा : १
लाल मिरचीची भरड : १ चमचा
काळी मिरी पावडर : आर्धा चमचा
सोया सॉस : २ चमचे
मीठ : चवी नुसार
तेल : २ चमचे
 
क्रमवार पाककृती:
शिळा भात मोकळा करून घ्यावा.
कांदा, लसूण, सिमला मिरची, टॉमेटो सर्व बारीक चिरून घावे.
तेल तापले की त्यात लाल मिरचीचा भरडा ( चिली फ्लेक्स) टाकावे, लसूण टाकावा. लगेच कांदा अन सिमला मिरची टाकावी. दोन मिनिटं परतावे.
त्यावर भात,टॉमेटो, मीठ, सोयासॉस, काळी मिरी पावडर टाकावी. मध्यम आचेवर ४-५ मिनिटं परतावे.
तयार आहे गरमा गरम चायनीज फोडणीचा भात !
 
वाढणी/प्रमाण:
माझ्या लेकाने सगळा गट्टम केला :)
 
अधिक टिपा:
मधल्या वेळेस मुलांना द्यायला छान !
वाटलं तर कोबी, फरजबी, गाजर, मटार ही यात अ‍ॅड करता येतील .
 
माहितीचा स्रोत:
माझाच प्रयोग

पोळ्यांचा पिझ्झा

साहित्य :५ ते ६ पोळ्या ( शिळ्या पोळ्याही चालतील-किंबहूना त्याचाच वापर करताना सुचलेला पदार्थ ),
उकडलेले बटाटे २,
कोणत्याही दोन भाज्या ( काल रात्री मुलांनी नाकं मुरडलेल्या),
कांदे २ - मोठ्या फोडी,
गाजर १ किसून,
टॉमेटो १ - मोठ्या फोडी,
सिमला मिरची १ - मोठ्या फोडी,
लाल मिरच्यांचे फ्लेक्स,
मिरपूड,
सॉस,
चीज

कॄती :
फ्राय पॅनला थोडे तेल लावून त्यावर पहिली पोळी ठेवावी. त्यावर सॉसचा एक थर द्यावा.
मग त्यावर दुसरी पोळी ठेवावी. त्यावर मॅश केलेला बटाटा+मीठ्+मिरपूड लावावी.
त्यावर तिसरी पोळी ठेवावी त्यावर भाजी क्र.१ लावावी.
पोळी क्र. ४ ,त्यावर सॉस्+कांद्याच्या फोडी.
पोळी क्र.५, त्यावर बटाटा+मीठ्+लाल मिरच्यांचे फ्लेक्स.
पोळी क्र. ६,सॉस + भाजी क्र. २.
पोळी क्र. ७, त्यावर भरपूर चीज किसावे, त्यावर कांदा, टोमेटो,गाजर, सिमला मिरची इ. टाकावे.
आता बारिक गॅसवर जाड तवा ठेऊन त्यावर हे फ्राय पॅन ठेवावे, झाकण लावून ५ ते ७ मिनिटांनी ( चीज वितळले की मग ) टोकेरी कालथ्याने पिझ्झ्यासारखे कापावे.

टीप :
यातील पोळ्या, चीज अन सॉस वगळता सर्व गोष्टी आवश्यक(उपलब्धतेनुसार) बदलू शकाल. नेहमी फोडणीची पोळी करून आणि खाऊन कंटाळा आला तर जरूर करून बघा.

रावण पिठले

लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी हरभरा डाळीचे जाडसर पीठ,
१/२ वाटी किसलेले सुके खोबरे,
१/२ वाटी तेल,
१/२ वाटी तिखट,
चवीपुरते मीठ
 
क्रमवार पाककृती:
१. किसलेले सुके खोबरे लालसर परतून थोडे भरडसर कोरडेच वाटून घ्यावे.
२. सर्व जिन्नस एकत्र करून जाड बुडाच्या पातेल्यात/ कढईत घालून घट्ट झाकण ठेऊन, मंद गॅसवर १५ ते २० मिनिटं ठेवावे.
 
वाढणी/प्रमाण:
दोघांसाठी पुरेल
      
अधिक टिपा:
कधीतरी कंटाळा आला असेल अन तोंडाला चव नसेल, तर चपाती/ भाकरीबरोबर मस्त लागतते. पण झणझणीत असल्याने नंतर ताकभात घ्यावा.