Saturday, August 26, 2023

कोळंबीची खिचडी


साहित्य

पाव किलो कोळंबी

लसूण 7-8 पाकळ्या

मिरची एक

एक कांदा

ओलं खोबरं नारळाची अर्धी वाटी

हळद, तिखट, मीठ

तांदुळ दोन वाट्या

कोथिंबीर


कृती

तांदुळ धुवून निथळत ठेवावेत.

कोळंबी निवडून पोटातला काळा धागा काढून स्वच्छ धुवावी. निथळून त्यावर हळद तिखट मीठ टाकून नीट मिक्स करावी.

ओलं खोबरं, लसूण, मिरची बारीक वाटून घ्यावी.

कांदा बारीक चिरून घ्यावा

एकीकडे आधणाचं पाणी बारिक गॅसवर ठेवावं. दुसरीकडे जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकून त्यात कांदा टाकून गुलाबीसर परतावा. मग त्यात कोळंबी टाकून ती ही परतावी. आता तांदूळ टाकावेत तेही परतावेत. त्यावर वाटणं टाकून आधणाचं पाणी टाकावं, मीठ टाकावं. आणि छान उकळी आली की गॅस बारीक करून झाकण घालून खिचडी शिजू द्यावी. वाढताना वरून ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू. सोबत पोह्याचा पापड तळुन वा साधा.

Friday, December 23, 2022

सोजी

 साहित्य

तांदुळ एक वाटी

बटाटा मध्यम एक सालं काढून मध्यम (साधारण 2इंचाचे)  तुकडे

कांदा मध्यम एक, बटाट्या सारखेच तुकडे

शेंगदाणे मूठभर

लवंग ४-५, दालचिनी एक तुकडा

हिंग, तिखट, हळद, मीठ चवी प्रमाणे

तेल 2 चमचे,  आवडत असेल तर तूप वापरलं तरी चालेल.

पाणी तीन वाट्या आधण, लागले तर अजून अर्धा वाटी.


कृती

तांदूळ धुवून निथळवत ठेवावेत. बटाट्याचे तुकडे धुवून निथळवत ठेवावेत.

पसरट, जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कुकरमधे तेल/ तुप टाकावे. त्यात हिंग टाकून लगेच लवंगा, दालचिनी टाकून कांदा टाकावा. जरा परतून त्यावर बटाटे, दाणे टाकावे. आता हळद, तिखट टाकून परतावे. आता तांदूळ टाकावेत तेही परतावेत. मग आधणाचं पाणी टाकून मीठ टाकावे. सगळे खळखळ उकळले की गॅस बारीक करून झाकण लावून खिचडी मऊ शिजू द्यावी. कुकर असेल तर तीन शिट्या करून दोन मिनिटं बारीक गॅस वर ठेवावा. ही खिचडी मऊसर असते.

तयार खिचडी वर तूप, सोबत पापड. आवडत असेल तर ताकाला वरून तूप जिऱ्याची फोडणी देऊन चमचाभर साखर, मीठ, कोथिंबीर घालून तेही सोबत द्यावे. 

Saturday, October 29, 2022

सीकेपी पद्धतीचे कोंबडीवडे पीठ

 

साहित्य( कंसात प्रमाण)

तांदुळ (6), उडिद डाळ(2), धणे(1), चणा डाळ(0.5), जिरे(0.25), मिरे(0.10)

तांदूळ धुवून सुकवून घेणे.

नंतर सगळं सुटं सुटं मंद गॅसवर गुलाबी भाजून घेणे.

आणि मग दळणे.

मटण, चिकन, मसूर आमटी वगैरे सोबत खायचे असतील तर,  मीठ, हळद, पाणी घालून थालिपीठा इतकं घट्ट भिजवून झाकून ठेवणे. दहा मिनिटांनी पाण्याचा हात लावून पुरीसारखे थापून तळणे. टम्म फुगतात.


नुसते खायचे असतील तर जास्तीचे तिखट, कोथिंबीर घालायचे. अन थापताना मेदुवड्या सारखे मधे भोक पाडून मग तळायचे. हेही रिंगसारखे फुगतात.

Thursday, October 27, 2022

रसलिंबू - लिंबाचे तिखट गोड लोणचे

 साहित्य 

लिंबू सहा

एक वाटी साखर

मीठ चमचाभर

तिखट 3 चमचे

हळद अर्धा चमचा

तेल 3 चमचे

हिंग


कृती

लिंबं स्वच्छ धुवून 10 मिनिटं पाण्यात ठेवावीत. मग पाच लिंबं प्रत्येकी 8 भागात चिरून, बिया सगळ्या नीट काढून टाकाव्यात. एका लिंबाचा रस काढून वेगळा ठेवावा.

आता लिंबाचे तुकडे ग्राईंडरमधे घालून बारीक वाटावे. सालीसकट.

मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात हिंग टाकावा. हिंग फसफसला की त्यावर लिंबाचे वाटण टाकावे. हळद, तिखट, मीठ, साखर सगळे घालून मोठ्या गॅसवर परतत रहावे. साखर विरघळून थोडी आटत आली की लिंबाचा रस घालून हलवून मंद गॅसवर शिजू द्यावे. लक्ष ठेवून मधून मधून परतत रहावे. मिश्रणाचा रंग जरा डार्क होऊ लागला की गॅस बंद करावा पण अधून मधून हलवावे.

पूर्ण गार झाले की बरणीत भरावे. साधारण एका दिवसातच लोणचे मुरु लागले, लगेच वापरायला हरकत नाही. 4-5 दिवसात सालीचा कडवटपणा पूर्ण जातो. या प्रमाणात साधारण दोन वाट्या रसलिंबू होते. 



Thursday, July 7, 2022

सीकेपी आंबटवरणं


तूरडाळ1 वाटी मूगडाळ 1 मुठ. धुवून, पाणी घालून, हळद, हिंग आणि थेंबभर तेल टाकून कुकरमधे छान शिजवून घ्यायची. मग ती रवीने मोडून पाणी टाकून जरा सैल करायची. हे सगळ्यांना सेम.


1. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, ती तडतडली की मेथ्या हिंग कढिपत्ता. त्यावर बारीक चिरलेला कांदा. तो ट्रान्सपरन्ट झाला की त्यावर शिजवलेली डाळ टाकायची. वर तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, गुळ,  कोथिंबीर टाकून पाच मिनिटं उकळवाचं.


2. पातेल्यात डाळ उकळवत ठेवायची त्यात तिखट, चिंचेचा कोळ, कोथिंबीर टाकायची. दुसरीकडे कढल्यात तेल. त्यात मोहरी अन ठेचलेला लसूण टाकायचा. मोहरी तडतडली की हिंग टाकून लगेच फोडणी उकळत्या आंबटवरणात टाकायची. वरून झाकण ठेवायचं. पाच मिनिटं तशीच उकळवायचे. 


3. पातेल्यात डाळ उकळवत ठेवायची. त्यात आमसुलं, कोथिंबीर टाकायची. दुसरीकडे तेलात मोहरी, बडिशेप चिमुटभर, लसूण ते तडतडलं की हिरवी मिरची, कढिपत्ता अन सगळं लगेच आंबटवरणात. झाकण. पाच मि उकळवणे.


4. तेलात मोहरी, हिंग, कढिपत्ता.  त्यावर बारीक चिरलेला कांदा परतणे. वर बारीक चिरलेला टॉमेटो परतणे. तेल सुटू लागलं की त्यावर डाळ, तिखट, मीठ. ओलं खोबरं, लसूण बारीक वाटून ते आंबटवरणात घालणे.  वरून कोथिंबीर

5. डाळ शिजवतानाच त्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो आणि हिरवी मिरची टाकायची.

सगळं,घोटून पाणी घालून उकळवत ठेवायचं. कढल्यात तेल, त्यात मोहरी, मेथ्या, हिंग, कढिपत्ता याची फोडणी करून ती आंबटवरणावर. झाकण. पाच मि उकळणे.


तळटिप- सीकेपी तिखटामधे धणे, बडिशेप इनबिल्ट असते. जर सेम स्वाद हवा असेल तर याच्या पावडरी चिमुटभर टाकत चला.

Wednesday, June 23, 2021

झटपट अंडा बिर्याणी

 साहित्य:

तांदुळ शक्यतो बासमती १ वाटी

अंडी २

बटाटे २

कांदे २

टॉमेटो १

आलंलसूणपेस्ट १ चमचा

तिखट १ चमचा

हळद अर्धा चमचा

गरम मसाला पूड १ चमचा

४मिरे, दालचिनीचे २ तुकडे, तमालपत्र १

४ काजू, ४ बेदाणे

पुदिना, कोथिंबीर एक मुठ

दही २ चमचे

पाव कप दूध

तेल

तूप १ चमचा

मीठ


कृती 

कुकरमधे पाणी घालून गॅसवर ठेवा

तांदुळ धुवून घ्या

कुकरच्या मोठ्या भांड्यात तांदुळ दोन वाट्या पाणी, एक चमचा तुप, अर्धा चमचा गरम मसाला आणि तांदळापुरतं मीठ घाला

दुसऱ्या भांड्यात अंडी आणि बटाटे ठेवा

दोन्ही भांडी कुकरमधे ठेवून कुकर बंद करून २ शिट्या करून ५ मिनिटं बारीक गॅसवर ठेवा। अन नंतर बंद करा

कुकर होई पर्यंत मोठ्या पॅनमधे तेल जरा जास्ती घ्या। दिड कांदा उभा चिरून तो तेलात परता। लाल होई पर्यंत परतायचा। दुसरीकडे उरलेला अर्धा कांदा बारीक चिरा। टॉमेटो बारीक चिरा।  काजु उभ्यात २-२ तुकडे करा। बेदाणेही उभ्यात दोन भाग करा।

एव्हाना कुकर झाला असेल गॅस बंद करा

कांदा लाल होईस्तोवर परता

गॅस बंद करून आता कांदा निथळून बाहेर काढा। तेल तसेच राहू देत

कुकर गार झाला असेल तर अंडी बटाटे काढून गार पाण्यात घाला

भाताचे भांडे काढून भात काट्याने मोकळा करा

अंडी बटाटे सोलून काट्याने जरा टोचे मारा

कांदा परतलेल्या  पॅन खालचा गॅस चालू करा। अंडी बटाटे त्यात टाका। वरून थोडे थोडे मीठ हळद तिखट टाका आणि पटपट परतून घ्या अन बाहेर काढा।

आता बारीक चिरलेला कांदा त्याच तेलात परता।  आलं लसूण पेस्ट परता। काजू, बेदाणे, मिरे, दालचिनी, तमालपत्र घाला। आता टॉमेटो टाकून परता मग गॅस बारीक करून झाकण ठेवा।

अंडी अन बटाटे अर्धे कापा।

झाकण काढून टॉमेटो शिजे पर्यंत परता। आता गॅस बंद करून मीठ हळद तिखट गरम मसाला घाला जरा परता। आता दही जरा घोटून यात घाला थोडे परता।  दिड वाट्या पाणी यात घाला। गॅस सुरु करा, बारीकच ठेवा।  कापलेले बटाटे अन अंडी नीट रचा। आता यावर निम्मी कोथिंबीर पुदिना टाका।वरून लाल परतलेला कांदा घाला। आता भात पसरा वरून उरलेली कोथिंबीर पुदिना टाका। सगळे हाताने जरा खाली दाबून बसवा।

ज्या भांड्यात परतलेली अंडी बटाटे काढून ठेवले  त्यात पावकप दुध टाका। छान निपटून घ्या। दुधाचा रंग छान केशरी होईल। हे दुध भातावर गोलाकार टाका।

आता झाकण ठेऊन मंद गॅसवर किमान १५ मिनिटं राहु देत। नंतर गॅस बंद करा।

५ मिनिटांनी वाढून घ्या, झटपट अंडा बिर्याणी!

 


Monday, April 26, 2021

साबुदाणा खिचडी (नेनेकाकु अन अवल मिश्रित😝)



कपभर साबुदाणा आधी नीट धुवा।

पांढरं पाणी गेलं की बाऊलमधे साबुदाणा भिजून वर अर्धपेर पाणी येईल असं भिजवा। रात्रभर। 

सकाळी ताटात पसरून ४ चमचे दुध वरून टाका।

एक मोठा बटाटा सोलून चौकोनी तुकडे करून चिरायचे। मिरच्या ३-५मोठे तुकडे

दाणे मुठभर मंद गॅसवर भाजून सोलून दाण्याचे कुट करणे

हे झाल्यावर कुकरमधे पाणी घालून स्टँड ठेवून त्यावर कुकरच्या मोठ्या भांड्यात भिजवलेला सादा, त्यात चमचाभर तेल साखर मीठ(सादापुरतं) घालून मिक्स करू,  शिटी काढून झाकण लावून १० मि वाफवत ठेवावा


दुसरीकडे तुप/तेल पॅनमधे तापवून जिरे घालून त्यावर बटाट्याचे तुकडे टाकायचे।मोठ्या गॅसवर जरा परतून मग ग॓स बारीक करून झाकण ठेवायचं।

कुकरची १० मि झाली असतील मग गॅस बंद करून सादा काढून ताटात पसरायचा। जरा चिकट वाटेल घाबरू नका। जरा पसरून गार होऊ दे

एव्हाना बटाटा शिजत आला असेल। तो शिजलाय बघून त्याच्यापुरतं मीठ टाका। त्यावर सादा टाका परता। दाकु टाका ५ मि परता। मऊ मोकळी खिचडी तयार